अधिक फॅट- शुगरयुक्त आहार मेंदूत घडवितो बदल
फॅट आणि शुगरचे प्रमाण अधिक असलेले खाद्यपदार्थ मानवी मेंदूत बदल घडवितात असे एका नव्या संशोधनात दिसून आले आहे. याचमुळे आम्ही चॉकलेट, चिप्स, फ्राइज खाण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. हे खाद्यपदार्थ दररोज खाल्ल्याने (भले कमी प्रमाणात का असेना) आमच्या मेंदूत या गोष्टी पुन्हा खाण्याची लालसा तयार होते. चॉकलेट, चिप्स यासारखे खाद्यपदार्थ खाणे आमच्या पसंतीचा भाग कसे ठरतात यामागे मेंदू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अजाणतेपणी अधिक फॅट आणि शुगरयुक्त खाद्यपदार्थ खाणे माणूस पसंत करू लागतो. ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी काही स्वयंसेवकांवर संशोधन करण्यात आल्याची माहिती संशोधिका शर्मिली एडविना थानाराजा यांनी दिली आहे. स्वयंसेवकांच्या एका गटाला 8 आठवड्यांपर्यंत अधिक फॅट आणि शुगरयुक्त पुडिंग खायला देण्यात आले. दुसऱ्या गटाला कमी फॅट आणि शुगरयुक्त पुडिंग खाण्यास दिले गेले. तसेच पुडिंग खाण्यापूर्वी आणि नंतर स्वयंसेवकांच्या मेंदूच्या हालचालींचे अध्ययन करण्यात आले. कमी फॅट आणि शुगरयुक्त पुडिंग खाण्याच्या तुलनेत अधिक पॅट-शुगरयुक्त पुडिंग खाल्ल्याने मेंदूचा प्रतिसाद अत्यंत अधिक राहिल्याचे यात दिसून आले. अधिक फॅट आणि शुगर मेंदूच्या डोपामिनर्जिक सिस्टीमला सक्रीय करते. डोपामिनर्जिक हा मेंदूचा हिस्सा माणसाला आनंदाची जाणीव करवित असतो. मेंदूच्या हालचालींच्या अध्ययनात चॉकलेट, चिप्स यासारखे खाद्यपदार्थ खाल्याने मेंदू स्वत:ला रिवायर करतो म्हणजेच कुठल्याही कारणाने मेंदूचे तुटलेली कनेक्शन्स अधिक फॅट आणि शुगरयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने पूर्ववत होऊ लागतात असे आढळून आले. मेंदू अजाणतेपणी आनंदाची जाणीव करून देणारे खाद्यपदार्थ पसंत करू लागतो, असे संशोधकांकडून सांगण्यात आले.









