ब्रिटनमधील युवतीच्या नावावर विश्वविक्रम
अलिकडच्या काळात सोशल मीडियावर अनेक ईटिंग चॅलेंजेस दिसून येतात. यात लोक मोठय़ा प्रमाणात खाद्यपदार्थ काही क्षणांमध्ये फस्त करण्याचा प्रयत्न करतात. भारतातही असे अनेक फूड ब्लॉगर्स आहेत, जे मोठय़ात मोठी डिश झटक्यात संपवितात. परंतु ब्ा्रिटनमधील लियहने स्वतःच्या या छंदापोटी आतापर्यंत अनेक विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. लियहने आता एक आठवडय़ाचे अन्न एकदाच खाऊन टाकत लोकांना थक्क करून सोडले आहे.
लियहने देशातील सर्वात मोठे ब्रेकफास्ट चॅलेंज करत हा विक्रम केला आहे. लियहने 8 हजार कॅलरीयुक्त हे चॅलेंज केवळ आठ मिनिटांमध्ये पूर्ण पेल आहे. बर्मिंगहॅम येथील लियहने आतापर्यंत खाण्याप्रकरणी 27 विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. यावेळी ह्यूज ब्रेकफास्ट चॅलेंज तिने मागील महिन्यातच पूर्ण केले आहे.

या नव्या चॅलेंजमध्ये लियहने पाच अंडी खाल्ली, तसेच 5 सॉसेज, पाच पेकन, पाच टॉमेटो, पाच हॅश ब्राउन आणि पाच ब्लॅक पुडिंगचे कप तिने फस्त केले. तसेच चॅलेंजमध्ये पाच टोस्ट, 5 बीन्सचे बाउल आणि 5 बाऊल भरून मशरुम तिने संपविले आहेत. या पूर्ण प्लेटमध्ये 8 हजार कॅलरी होती. लियहचे वय आणि वजन पाहता 8 हजार कॅलरी तिच्यासाठी आठवडाभर पुरणारी आहे. परंतु लियहने हे सर्व खाद्यपदार्थ एकाचेळी केवळ 8 मिनिटांमध्ये खाऊन संपविले आहेत.
लियहपूर्वी यासंबंधीचा विक्रम करणाऱया व्यक्तीने याकरता 12 मिनिटे 50 सेकंदांचा वेळ घेतला होता. हा विक्रम दोन आठवडय़ांपूर्वीच नोंदविला गेला होता. पूर्वीचा विक्रम अत्यंत जबरदस्त असल्याने तो मोडताना मी अत्यंत अस्वस्थ होते. हे चॅलेंज खूपच महाग होते असे युटय़ूबर असलेल्या लियहने म्हटले आहे. लियहचा खाण्याच वेग पाहून मी अचंबितच झाल्याचे कॅफेचे मालक अली क्लिफ्टन यांनी नमूद केले आहे.









