वृत्तसंस्था/ दौसा
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला दिल्लीहून अजमेरला तीर्थयात्रेसाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर दौसा येथे ही दुर्घटना घडल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली. या अपघातात दिल्ली पोलिसांचे दोन कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर दौसा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एस्कॉर्टमधील पोलीस वाहनाने गायीला धडक दिल्यानंतर एअर बॅग्ज उघडल्यामुळे गाडीतून प्रवास करणाऱ्या दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले. दिल्ली पोलिसांचे वाहन माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या ताफ्याला एस्कॉर्ट करत होते.
अपघातग्रस्त एस्कॉर्ट वाहनामध्ये तीन कमांडो आणि एक चालक होता. दौसामधील भंडाराज इंटरचेंजजवळ अचानक ताफ्यासमोरील झाडांमधून गाय समोर आल्यामुळे ही रस्ते दुर्घटना घडली. या अपघातात दिल्ली पोलिसांच्या गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे.









