दुबार पेरणी केलेले पीक पुन्हा वाया जाण्याची भीती
बेळगाव : मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील हजारो एकर शेती पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहे. दुबार पेरणी करण्यात आलेले भातपीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडला असून भातपीक कुजण्याची भीती लागली आहे. बळ्ळारी नाल्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याकडे प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बळ्ळारी नाल्याला पूर येऊन पाणी परिसरातील शेतांमध्ये पसरले आहे. अनगोळ शिवारातील 200 एकर, शहापूर 250, वडगाव 200, माधवपूर 150, जुने बेळगाव 200, हलगा 100, बेळगाव 150 यासह अलारवाड, कुडची आदी परिसरातील हजारो एकर शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. यापूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसात बळ्ळारी नाल्याला पूर आला होता. पुराचे पाणी शेतवडीत शिरल्याने अनेक दिवस भातपीक पाण्याखाली गेल्याने ते कुजले होते.
मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणी केली. भातरोप लागवड करण्यासाठी रोप मिळत नसल्याने इकडून तिकडून रोप मिळवत शेतकऱ्यांनी शेती केली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बळ्ळारी नाल्याला पुन्हा एकदा पूर आल्याने दुसऱ्यांदा शेती पाण्याखाली गेली आहे. हजारो रुपये खर्च करून बळ्ळारी नाल्याजवळील शेती शेतकरी दरवर्षी करत असतात. मात्र, पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत चालला आहे.
सरकारकडून प्रतिगुंठ्याला 38 रुपयेप्रमाणे नुकसानभरपाई दिली जात आहे. मात्र, ही नुकसानभरपाईची रक्कम म्हणजे एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचा आरोप केला जात आहे. बळ्ळारी नाल्यापासून होणाऱ्या नुकसानीची पाहणी स्वत: पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. येळ्ळूर रोडवरील सिद्धिविनायक मंदिरात गतवर्षी 24 जुलै 2024 रोजी पाणी आले होते. यंदा 20 ऑगस्ट रोजी पुराचे पाणी मंदिरात शिरले आहे. गुडघाभर पाणी मंदिरात शिरल्याचे दिसून येत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास दुबार पेरणी केलेले पीकही कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.









