सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
खानापूर : तालुक्यात सर्वत्र शेतीसाठी पुरवण्यात येणारा वीजपुरवठा गेल्या महिन्याभरापासून सुरळीत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. कशीबशी हातातोंडाशी आलेली पिके पाण्याविना वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हेस्कॉमकडून शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा वेळेवर तसेच योग्य दाबाने करण्यात येत नसून कोणतीही सूचना नसताना दिवसा किंवा रात्री थोडावेळ वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. विजेच्या खेळखंडोब्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. तसेच पिकांचेही नुकसान होत आहे. यासाठी हेस्कॉमने शेतीसाठी लागणारा विजेचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
तालुक्यातील शेती पाऊस नसल्याने धोक्यात आली आहे. शेतकरी उरलीसुरली पिके पाणी देवून जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महिन्याभरापासून शेतीसाठी लागणारा विद्युतपुरवठा वेळेवर तसेच आवश्यक असलेल्या दाबाने थ्रीफेज आणि सिंगलफेज विद्युतपुरवठा करण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची पिके वाळून जात आहेत. यापूर्वी काही भागात रात्री 10 ते सकाळी 6 तर काही भागात सकाळी 7 ते सायंकाळी 5 असा विद्युतपुरवठा करण्यात येत होता. मात्र सिंगलफेज तसेच थ्रीफेज विद्युतपुरवठाच बंद केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरले आहे. काही ठिकाणी अचानकपणे ठराविक वेळ थ्रीफेज पुरवठा करण्यात येत आहे. मात्र याची कल्पना शेतकऱ्यांना नसल्यामुळे वीजपुरवठा असूनही शेतकऱ्यांना याची माहिती होत नाही. वारंवार हेस्कॉमला विनंत्या अर्ज करूनदेखील याबाबत कोणतीच सुधारणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येत्या आठ दिवसात संपूर्ण तालुक्यात शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
तांत्रिक व्यत्ययामुळे वीजपुरवठा खंडित
याबाबत हेस्कॉमच्या अभियंत्या कल्पना तिरवीर यांना विचारले असता, विद्युतपुरवठ्यामध्ये तांत्रिक व्यत्यय असल्याने वीजपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. मात्र येत्या चार-पाच दिवसात हा विजपुरवठा सुरळीत होणार असून याबाबतचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असल्याचे सांगितले.









