अनगोळ, शहापूर शिवारातील प्रकार : ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर, अनगोळ शिवारातील लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या व नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मरमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हेस्कॉम कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तक्रार केल्यानंतर तात्पुरती दुरुस्ती होते. परंतु पुन्हा तीच समस्या उद्भवत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांच्या या कारभारामुळे शेती मात्र पाण्याविना सुकत असल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव परिसरातील शेतकरी कृषी पंपाच्या साहाय्याने भाजीपाला तसेच इतर पिके घेतो. विशेषत: अनगोळ, शहापूर, येळ्ळूर, मजगाव या शिवारांमध्ये गाजर, कोथिंबीर, मुळा, फ्लॉवर यासह इतर पालेभाज्या पिकविल्या जातात. सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे पिकाला वरचेवर पाणी देणे गरजेचे आहे. परंतु अनियमित विजेमुळे पिकाला पाणी देणे अवघड होत आहे. त्यातच ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाल्यास वेळेत दुरुस्त होत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी
वीजवाहिन्या लोंबकळत असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करताना वीजवाहिन्यांचा अडथळा ठरत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी याची दखल घेत दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.









