पंचवीस वर्षांचा असुविधांचा वनवास आता तरी संपणार का
आरामगृह, कचऱ्यापासून खत प्रकल्प, हमीभाव केंद्र अशा सुविधांची अपेक्षा
कोल्हापूर/ धीरज बरगे
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी, व्यापारी अडीच दशकांपासून मुलभूत सुविधांच्या प्रतिक्षेत आहे. यंदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुविधा पुरविण्याबाबत सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडले असले तरी गेल्या अडीच दशकांचा असुविधांचा वनवास आत्तातरी संपणार का, असा प्रश्न शेतकरी, व्यापाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. सुविधा पुरविताना शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी आरामगृह सवलतीच्या दरात भोजन, कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प, हमीभाव केंद्र, कोल्ड स्टोअरेज अशा सुविधा उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बाजार समितीमध्ये कांदा, बटाटा, लसून, फळे, भाजीपाला, चिवा, गुळ घेवून येणारे शेतकरी आहेत. तर जिल्ह्यासह कोकण, कर्नाटक येथून खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. शेतकरी, व्यापारी यांना सुविधा पुरविण्यासाठी सेस कर आकारला जातो. मात्र या करामधून शेतकरी व्यापारी यांना सुविधा पुरविण्यात बाजार समिती प्रशासन अपयशी ठरले आहे.
शेतकरी व्यापाऱ्यांसाठी आरामगृह उभारा
बाजार समितीमध्ये परजिल्हा, परराज्यातून शेतमाल घेवून येणारा शेतकरी आहे. कर्नाटक, कोकणातील व्यापारीही खरेदीसाठी येतात. लांब पल्याचा प्रवास करुन आल्यानंतर शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी आरामगृह नाही. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी आरामगृह उभारण्याची मागणी होत आहे.
सवलतीच्या दरात कॅन्टीन सुरु करावे
बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजार समिती प्रशासनाने सवलतीच्या दरात कॅन्टीन सुरु करावे. सध्या खासगी तत्त्वातर कॅन्टीन सुरु असल्याने नाष्टा, भोजन यावर शेतकऱ्यांचा खर्च होत आहे. मालाला किती भाव मिळेल हे माहित नसल्याने कधीकधी शेतकऱ्यांना तोटाही सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समिती प्रशासनाने सवलतीच्या दरात कॅन्टीन उपलब्ध करुन द्यावे, अशीही मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
उद्यान बनले वाहनतळ
येथील उद्यानांचीही देखभाल ठेवली जात नसल्याने उद्यानांची दूरावस्था झाली आहे. तात्यासाहेब मोहिते यांच्या नावाने असणारे उद्यान गायब झाले असून ते वाहनतळ बनले आहे. त्यामुळे उद्याने सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प
बाजार समिती आवारात अनेक ठिकाणी कचरा पडून असतो. भाजीपाला, फळ मार्केटमधून मोठ्याप्रमाणात कचरा होते. यामुळे बाजार समिती आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरु करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे.
कोल्ड स्टोअरेज, हमीभाव केंद्र सुरु करा
बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना शेतमाल साठवणुकीसाठी कोल्ड स्टोअरेज नाही. त्यामुळे येथे कोल्ड स्टोअरेज सुरु करावे, अशीही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. तर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी हमीभाव केंद्र सुरु करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.









