उचगावच्या पूर्व भागातील शेतवडीतील शेतकऱ्यांतून समाधान : निवेदन देऊनही ग्रा. पं.चे दुर्लक्ष
वार्ताहर/उचगाव
उचगावमधील हजारो शेतकऱ्यांची जीवनदायीनी म्हणून ओळखला जाणारा सारण (मुतवली) रस्ता गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींनी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू शेतकरी वर्गावरच या रस्त्याची दुरुस्ती करण्याची वेळ आली आणि बुधवारी शेतकऱ्यांनीच दोन किलोमीटर अंतराचा रस्ता श्रमदानातून केल्याने उचगावच्या पूर्व भागातील या शेतवडीतील हजारो शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उचगावमधील सुपीक जमीन पूर्व भागामध्ये उचगाव आणि मण्णूर या पट्ट्यामध्ये पसरलेली आहे. या शेतवडीमध्ये भात, ऊस विविध प्रकारचा भाजीपाला ही सर्व पिके खरीप आणि रब्बी हंगामामध्ये घेतली जातात. तसेच या दोन गावांच्या मध्यभागातील शेतीमधून मार्कंडेय नदी वाहत असल्याने नदीच्या दुतर्फा हजारो एकर जमिनीतील पिकाखाली लागवड केली जाते. मात्र या उचगाव-मण्णूर या अॅप्रोच रस्त्याची दुर्दशा पाहता या रस्त्यावरून ये-जा करणेही मुश्किल होते. या संदर्भात आमदारांशी अनेकवेळा निवेदने, विनंती करूनही तसेच या रस्त्याच्या शुभारंभाचे दोनवेळा नारळही फोडण्यात आले. मात्र या रस्त्याची दखल अद्याप घेतली गेली नाही.
शेवटी या भागातील असंख्य शेतकरी एकत्र येऊन या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शेतकऱ्यांनीच हाती घेतले. आणि दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरती माती, बोर्डर, खडी टाकून हा रस्ता शेतकरी वर्गाला ये-जा करण्यासाठी तयार केल्याने पावसाळ्यात होणारा गुडघाभर चिखल आणि उन्हाळ्यात उडणारी धूळ यापासून आता शेतकरी वर्गाला या संकटातून थोडी मुक्तता मिळालेली आहे. उचगाव ते मण्णूर हे एकूण तीन किलोमीटरचे अंतर असून या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यामध्ये मध्यंतरी मार्कंडेय नदी येथे यावरती पूल घातला तर गोजगेमार्गे अथवा उचगाव-सुळगामार्गे जावे लागते. सदर रस्ता तयार झाला तर हे अंतर कमी होते. यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे.तसेच मार्कंडेय नदीवरती या ठिकाणी जर पूल घालण्यात आले तर ये-जा करण्यासाठी सर्व वाहनांना याचा उपयोग होतो. सदर रस्त्याच्या बाजूने पाण्याचा मोठा प्रवाह मार्कंडेय नदीला जाऊन मिळतो. उचगाव गावाजवळील तलावातील जादा पाण्याचा साठा या सारणमार्गे जातो आणि मार्कंडेय नदीला जाऊन मिळतो. या सारणीतील पाणी उन्हाळ्यामध्ये शेतकरी आपल्या पिकांना वापरत असतात. यामुळे या पाण्याचा दुहेरी उपयोग शेतकऱ्यांना होत असतो. मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी वर्गाची कुचबंणा होत होती.









