सात-बारा उताऱ्याची वरचेवर पाहणी करण्याची गरज : बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्या ‘त्या’ टोळक्यावर कारवाईची मागणी
बेळगाव : होनगा, काकती परिसरातील शेत जमिनीतील सात-बारा उताऱ्यामध्ये फेरबदल करून जमिनी परस्पर विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. काही टोळ्या कार्यरत आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बोगस पेपर तयार करणाऱ्या या टोळक्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. काही दिवसांपूर्वी तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सात-बारा उताऱ्यामध्ये गैरप्रकार केला होता. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल निरीक्षक आणि तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आणखी अशीच काही प्रकरणे उघडकीस येत आहेत. या घटनेमध्ये उपनोंदणी कार्यालयातील काही कर्मचारी सामील झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनीही त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
वटमुखत्यारपत्र तयार करून विक्री केल्याचा प्रकार उघड
होनगा येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीचेही वटमुखत्यारपत्र तयार करून विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उपनोंदणी कार्यालयातून बोगस आधारकार्डाद्वारे जमिनीची विक्री केल्याचा प्रयत्न झाला होता. तलाठ्याने याबाबत संबंधित शेतकऱ्याला कल्पना दिल्यामुळे पुढील मोठी फसवणूक टळली आहे. सदर व्यक्ती अशाच प्रकारे जमिनींमध्ये फेरफार करून विक्री करत आहेत. तेव्हा याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
केवळ स्टॅम्पड्युटी मिळते म्हणून नोंदणी
मयत झालेल्या व्यक्तीकडून वटमुखत्यारपत्र तयार करण्यात आले होते. वटमुखत्यारपत्र तयार करताना उपनोंदणी कार्यालयामध्ये बोगस व्यक्तीला उभे करण्यात आले आहे. त्याचे आधारकार्ड तपासले असता दुसरेच नाव येत आहे. त्यामुळे उपनोंदणी कार्यालयातील कर्मचारी या प्रकारामध्ये सामील आहेत, असे स्पष्ट दिसून येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे खरेदीसाठी लागणारी स्टॅम्पड्युटी (मुद्रांक शुल्क) आपण भरून खरेदी केली जाते. ती रक्कम फसवणूक करणाऱ्या व्यक्ती बिनधास्तपणे भरतात. तसेच सरकारला स्टॅम्पड्युटी मिळते म्हणून उपनोंदणी कार्यालयातील अधिकारी हा प्रकार करत आहेत. मात्र यामुळे शेतकऱ्याची पूर्णपणे फसवणूक होत आहे. तेव्हा या प्रकाराकडे उपनोंदणी अधिकाऱ्यांनीही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
‘त्या’ शेतकऱ्याला नाहक फटका
वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतकरी वारसा करून घेण्याकडे दुर्लक्ष करत असतात. बरीच वर्षे तशीच कागदपत्रे असतात. सात-बारावरही मयत झालेल्या व्यक्तीचेच नाव असते. तीच संधी साधत बोगस व्यक्तीला पुढे करून खरेदी-विक्री केली जात आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी तातडीने वारसा करून आपल्या सात-बारावर वारसांची नावे दाखल करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकारे नाहक फटका बसू शकतो. सध्या या शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वरचेवर सात-बारा उताऱ्याची पाहणी करा
सध्या काही टोळ्या कार्यरत आहेत. एकाचे नाव दुसऱ्याच्या नावावर दाखल करणे असे प्रकार या टोळ्या करत आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी किमान वर्षातून दोन ते तीनवेळा सातबारा उतारा काढून पहावा, अन्यथा असे भामटे उताऱ्यांमध्ये फेरफार करून तुम्हालाही नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
न्यायालयात खटले दाखल असताना जागेची विक्री
अनेक शेतकऱ्यांचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. असे असताना काही जण परस्पर जमिनी विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या शेतकऱ्यांना असे भामटे मदत करत आहेत. तेव्हा खरेदीदारांनीही कोणतीही जमीन खरेदी करताना त्या जागेची किंवा जमिनीची संपूर्ण माहिती घेऊनच खरेदी करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा नाहक पैसे देऊन आपलीही त्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.









