बेळगाव : सध्या बेळगाव व खानापूर तालुक्यात भातकापणीचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु, कापणीसाठी मजुरांचा तुटवडा असल्याने अखेर यंत्रांचा आधार घ्यावा लागला आहे. सध्या भातकापणीसाठी यंत्राचा वापर केला जात असून त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल पहायला मिळत आहे. मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे भातकापणीला ब्रेक लागला होता. शनिवारपासून ऊन पडू लागल्याने भातकापणीचा हंगाम सुरू झाला. यावर्षी उशिरापर्यंत पाऊस झाल्याने भातकापणीचा हंगाम पंधरा दिवस लांबला. त्यामुळे भातपिकाचे नुकसान होऊ लागले आहे. काही ठिकाणी भात गळून पडू लागले असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊ लागले आहे. भातकापणीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज लागते. परंतु, शहरासह ग्रामीण भागात मजूरच उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.
अधिक मजुरी देऊनही मजूर नसल्याने गोची
दिवसाकाठी साडेतीनशे ते चारशे रुपये मजुरी देऊन देखील मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची घालमेल सुरू आहे. एकीकडे भातपिकाचे नुकसान तर दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने अखेर यंत्राचा वापर केला जात आहे. बेळगाव शहरासह तालुक्यात काही जणांनी भातकापणीचे यंत्र घेतले आहे. अनगोळ, वडगाव येथे सात ते आठ यंत्रे उपलब्ध असल्यामुळे त्यांच्या आधारे भातकापणी केली जात आहे. विशेषत: भातकापणीचे काम हे महिलावर्ग करत असतात. परंतु, बेळगाव तालुक्यातील महिला या शहरात, औद्योगिक कारखाने, आस्थापने, व्यवसायामध्ये असल्याने महिला मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंत्रांशिवाय पर्याय राहिलेला नाही. येत्या चार दिवसात भाताची कापणी केली नाही तर नुकसान अधिक होण्याची शक्यता आहे.









