धूळवाफ पेरणीची कामे पूर्ण, पावसाच्या रिपरिपीमुळे व्यत्यय : उर्वरित कामे उरकण्यात शेतकरी मग्न
बेळगाव : धूळवाफ पेरणीची कामे जवळजवळ पूर्ण झाली असून, शेतकरी रोप लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या भात पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम असल्याने रोप लागवडीसाठी केली जाणारी पेरणी देखील ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाच्या उघडिपीकडे लागून राहिल्या आहेत. गेल्या 15 दिवसापूर्वी झालेल्या वळीव पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. सतत दहा दिवस पावसाने हजेरी लावल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे ठप्प झाली होती. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने रखडलेली मशागतीची कामे उरकून घेण्यासह धूळवाफ पेरणीची कामे सुरू झाली. ट्रॅक्टर, बैलजोडी तसेच माणसांच्या मदतीने पेरणीची कामे शेतकऱ्यांनी घाईघाईने उरकून घेतली. सध्या तालुक्यातील चित्र पाहता जवळजवळ धूळवाफ पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. मान्सूलला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी सध्या रोप लागवाडीसाठी आवश्यक असणाऱ्या भात पेरणीत व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कृषी केंद्रांमध्ये भात बियाणे उपलब्ध
कृषी सेवा केंद्रांमध्ये वेगवेगळ्या जातीच्या भातांची बियाणे उपलब्ध आहेत. सध्या वाडाकोलम जातीच्या भाताला अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्याचबराब्sार इंद्रायणी, शुभांगी, अमन, इंद्रायणी (महाबीज), सौभाग्य, साईराम, अमानी, वरदान, चिंटू, कावेरी, युएस 312, अमोघ, एन 125, ओमसाई, सुप्रीम सोना, ओम 3, महान, कल्याणी, दप्तरी, बाहुबली, जया, सुंदर, अनोखी, आदी प्रकारच्या भात बियाणांची मागणी वाढली आहे. भात बियाणांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. यासाठी आवश्यक रासायनिक खते आणि औषधांच्या मागणीतही वाढ झाली आहे. आणखी दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यास रोप लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या पेरणींची कामेही पूर्ण होण्यास मदत होणार आहे.









