ठेकेदाराला धरले धारेवर : दाव्याचा निकाल लागेपर्यंत काम सुरू न करण्याची मागणी : काहीवेळ गोंधळाचे वातावरण, शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
बेळगाव : विरोध डावलून सुरू करण्यात आलेले हलगा-मच्छे बायपासचे काम रविवार दि. 5 रोजी संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा हाणून पाडले. यावेळी मातीचे सपाटीकरण करणारा जेसीबी पेटवून देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केल्याने जेसीबी चालकाने बायपास रोडवरून जेसीबीसह धूम ठोकली. आक्रमक बनलेल्या शेतकऱ्यांनी ठेकेदाराला धारेवर धरत बायपासवरच ठाण मांडले. त्यामुळे काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हलगा-मच्छे बायपासला गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरू आहे. तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि ठेकेदाराकडून शेतकऱ्यांचा विरोध पायदळी तुडवत रस्त्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला आहे. झिरो पॉईंट निश्चित होत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम करण्यात येऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. पण, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याआधीच ठेकेदारांकडून घाईघाईने रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जेसीबी पेटवून देण्याचा प्रयत्न
अधिवेशन काळात 15 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी बायपासचे काम बंद पाडले होते. त्यानंतर तब्बल वीस दिवस रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले होते. पण, ठेकेदाराने पुन्हा शनिवारपासून सुऊवात केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी बायपासच्या ठिकाणी धाव घेत ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना काम बंद करण्यास सांगत पिटाळून लावले. रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर दाखविण्यात यावी, जमीन गमावलेल्या कोणत्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे, त्याची यादी द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र, ठेकेदाराकडे कोणत्याच प्रकारची कागदपत्रे नसल्याने शेतकऱ्यांनी संबंधितांना धारेवर धरत काम बंद पडले. रस्त्याच्या ठिकाणी माती टाकण्याचे काम सुरू होते.
त्यामुळे जेसीबी पेटवून देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. त्यावेळी प्रसंगावधान राखत जेसीबीचालकाने जेसीबीसह घटनास्थळावरून पलायन केले. बराच उशीर शेतकरी आणि ठेकेदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आक्रमक बनल्याने काही वेळानंतर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. झिरो पॉईंट निश्चित होत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम करण्यात येऊ नये. या भूमिकेवर शेतकरी ठाम राहिल्याने अखेर ठेकेदाराने तेथील काम बंद केले. या घटनेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी बायपासवर ठाण मांडून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध केला.
भीतीने सोडली जागा
बायपासचे काम सुरू करण्यात आल्याने ठेकेदार व त्यांचे कर्मचारी बायपासच्या ठिकाणी झाडाच्या खाली खुर्च्या घालून निवांत बसले होते. त्याठिकाणी त्यांची दोन बोलेरो वाहने देखील होती. तितक्यात शेतकऱ्यांनी बायपासकडे कूच केली. शेतकऱ्यांना पाहताच बिथरलेल्या ठेकेदाराने आणि कर्मचाऱ्यांनी तेथील सर्व साहित्य पटापट वाहनात भरून बायपासवरील वाहने अन्यत्र हलविली.









