बेळगाव-पणजी महामार्गात जमीन गेलेल्या लोंढा जि. पं. क्षेत्रातील शेतकऱयांची बैठक
प्रतिनिधी /खानापूर
बेळगाव-पणजी महामार्गासाठी खानापूर तालुक्यातील शेतकऱयांची जमीन घेतली आहे. त्यापैकी लोंढा जि. पं. कार्यक्षेत्रातील होनकल, शिंदोळी, नायकोल, सावरगाळी, माडीगुंजी, लोंढा, अस्तोळी, राजवाळ या गावातील शेतकऱयांची जमीन महामार्गासाठी घेतली आहे. मात्र शेतकऱयांना जमिनीचा मोबदला सरकारकडून अद्याप मिळालेला नाही. यासाठी ता. भाजपतर्फे लोंढा जि. पं. क्षेत्रातील जमीन गेलेल्या शेतकऱयांची नुकतीच गुंजी माउली मंदिरात बैठक घेतली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरींनी मार्गदर्शन केले.
भू-संपादन अधिकारी महसूल विभाग व प्राधिकरण यांच्यात समन्वय नसल्यामुळे गुंजी भागातील शेतकऱयांवर अन्याय झाला आहे. शेतकऱयांना अत्यंत तुटपुंजी नुकसानभरपाई त्यांच्या खात्यावर जमा केली आहे. याबाबत शेतकऱयांनी महसूल विभाग व रस्ते महामार्ग प्राधिकरणाशी नुकसानभरपाई बाबत संपर्क साधला असता, अधिकाऱयांकडून योग्य मार्गदर्शन न करता आम्हाला पिटाळून लावले जाते. तसेच कमिशनच्या बाबतीत विचारणा केली जाते. मात्र भरपाई देण्याचे नाव घेत नाहीत. सरकारने जमीन अधिग्रहण करुन कामही सुरू केले आहे. तालुक्यातील अन्य शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळाली. मात्र, लोंढा जि. पं. क्षेत्रातील शेतकरी मात्र नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. अशी तक्रार बैठकीत केली.
भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन
जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी याबाबत तातडीने वरिष्ठापर्यंत कागदपत्रासह पाठपुरावा करुन लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून देवू, असे ठोसपणे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष संजय कुबल, माजी जि. पं. सदस्य बाबुराव देसाई यांनीही आपण शेतकऱयांच्या पाठिशी असल्याचे जाहीर केले. भरपाई मिळवण्यासाठी संघटितपणे लढा उभारण्याचा ठरावही यावेळी संमत केला. यावेळी प्रकाश निलजकर, मोहन पाटील, परशराम गोरल, धानाप्पा पाटील, गुंजाप्पा घाडी, पुन्नाप्पा गावडा, मारुती गावडा, संजय देसाई, निलेश कुंद्रे,तानाजी गोरलसह लोंढा जि. पं. क्षेत्रातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









