बेळगाव : वडगाव परिसरात तीन तलाव असून त्यांच्या सुशोभीकरणाचे काम महानगरपालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. यापैकी मंगाईनगर वडगाव येथील तलावाचे काम पूर्ण झाले असून तलावाभोवती कठडा बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र या तलावात गेल्या अनेक वर्षांपासून वडगाव परिसरातील शेतकरी आपली जनावरे धुण्यासह पाणी पिण्यासाठी घेऊन जातात. त्यामुळे जनावरांना तलावात प्रवेश करण्यासाठी एका बाजूने रस्ता सोडण्यात यावा तसेच तलावाची खोली वाढवू नये, अशा मागणीचे निवेदन मंगळवार दि. 4 रोजी वडगाव येथील शेतकऱ्यांनी मनपा आयुक्त शुभा बी. यांची भेट घेऊन दिले. वडगाव परिसरातील शेतकऱ्यांची जनावरे मोठ्या प्रमाणात असून जनावरांना पाणी पिण्यासाठी विहिरी नाहीत.
त्यामुळे याठिकाणी असलेल्या तीन तलावांचा वापर जनावरांसाठी केला जातो. बळ्ळारी नाल्याचे पाणी वापरण्याजोगे नसल्याने शेतकऱ्यांना या तलावावरच अवलंबून रहावे लागत आहे. मनपाच्यावतीने पुरविले जाणारे पाणी अपुरे पडत असल्याने शेतकरी आपली जनावरे धुण्यासह पाणी पिण्यासाठी तलावात घेऊन जातात. त्यामुळे हे तलाव शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. महापालिकेच्यावतीने सदर तलावांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या विकासाला आपला विरोध नसून केवळ जनावरांना तलावात जाण्यासाठी वाट सोडावी. तसेच तलावांची खोली जास्त वाढवू नये, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली. महापालिका आयुक्त शुभा बी. आणि अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत लवकरच तलावाला भेट देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









