कृषी उत्पादन करा, स्वावलंबी व्हा, मदतीसाठी सरकार सज्ज – मुख्यमंत्र्यांचे आवाहन : मुरगावच्या विभागीय कृषी कार्यालयाचे कुठ्ठाळीत उद्घाटन, अखेर मागणी पूर्ण
वास्को : मुरगाव तालुक्याला अखेर काल शुक्रवारी विभागीय कृषी कार्यालय लाभले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कार्यालयाचे उद्घाटन केले. कृषी जमीनी पडिक ठेवू नका, विकू नका, या जमीनीतून कृषी उत्पादन करा, राज्य सरकार तांत्रीक व अर्थिक मदतीसाठी तयार आहे. स्वावलंबी बना. कृषी उत्पादनासाठी इतर राज्यांवर अवलंबून राहू नका असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी या कार्यक्रमात केले. मुरगाव तालुक्याचे विभागीय कृषी कार्यालय कुठ्ठाळीतील मार्केट संकुलात उघडण्यात आलेले असून अनेक वर्षांच्या मागणीनंतर हे कार्यालय मुरगावच्या शेतकऱ्यांना लाभलेले आहे. कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास या कार्यालयासाठी सरकारशी वाटाघाटी करीत होते. मुरगाव तालुक्यातील एwशी टक्के शेतकरी कुठ्ठाळी मतदारसंघात असल्याने तालुक्याचे कृषी कार्यालय वास्को शहरा ऐवजी कुठ्ठाळीतच व्हावे अशी मागणी अँथनी वास यांनी केली होती. आमदार वास व मुरगावच्या शेतकऱ्यांची मागणी अखेर शुक्रवारी पूर्ण झाली. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कृषीमंत्री रवी नाईक, आमदार अँथनी वास, आमदार दाजी साळकर, जिल्हा पंचायत सदस्य अॅङ अनिता थोरात, जिल्हा पंचायत सदस्य मेर्सियाना वास, कुठ्ठाळीच्या सरपंच सेनिया परेरा, कृषी खात्याचे संचालक नेव्हील आल्फोन्सो व इतर मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी प्राकृतीक शेतीकडे वळायला हवे
मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांना कृषी उत्पादनासाठी सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ घ्या. किसान क्रेडीट कार्ड व कृषी कार्डाचा लाभ घ्या. नव्या कार्यालयातून सर्व आवश्यक सोयी सुविधा व योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी तांत्रीक व आर्थिक सहकार्य देण्यास तयार आहे. सरकार शेतकऱ्याना स्वताच्या पायावर उभे करण्याचे कार्य करीत आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमीनींवर उत्पादन घ्यावे. त्या पडिक ठेवू नयेत तसेच विकण्याचाही प्रयत्न करू नये. आपल्या शेत जमीनी पुढील पिढीसाठी सुरक्षीत ठेवायला हव्यात. त्यासाठीच शेत जमीनींच्या सुरक्षेसाठी सरकारने कायदा केलेला आहे. प्राकृतीक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळायला हवे. सरकार शेतकऱ्यांना शून्य व्याजाने कर्ज पुरवठा करीत आहे कष्ट करायची तयारी ठेवा. लाभ निश्चितच होईल असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले. कृषी उत्पादनाच्या बाबतीत गोवा स्वंयपूर्ण बनायला हवा. इतर राज्यांवर अवलंबून राहू नका असे ते म्हणाले.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी बेडकांचे संरक्षण करा
यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतीसाठी बेडुक किती महत्वाचा आहे हे विषद केले. बेडुक शेतीसाठी उपयुक्त आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बेडुक सुरक्षीत असणे आवश्यक आहे. त्याला मारू नका. बेडुक खाण्यापेक्षा चिकन खा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिला. बेडकांची शिकार करणाऱ्यांवर सरकार कारवाई करेल असे ते म्हणाले. कृषीमंत्री रवी नाईक यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी अधिकाअधिक जमीन लागवडीखाली आणण्याचे आवाहन केले. शेती वाढायला हवी. गोवा पुढील पिढीसाठी सुरक्षीत राहायला हवा. शेती कुळागरे जपायला हवीत. ती काळाची गरज आहे असे मंत्री रवी नाईक म्हणाले. कृषी विकासासाठी सरकार राबवीत असलेल्या विविध योजनांचीही माहिती त्यांनी दिली.
आमदार अँथनी वास यांनी कुठ्ठाळी परीसरातील शेती राखण्यासाठी आपण व शेतकऱ्यांनी आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमांची माहिती दिली. तसेच कुठ्ठाळी फारमर्स क्लबतर्फे शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या मदतीचीही त्यांनी माहिती दिली. शेतकरी शेती करण्यासाठी कचरतात यामागील कारणे सांगतांना आमदार वास यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. येतील शेत जमीनीवरील अडचणीही मांडल्या. कुठ्ठाळीतील विभागीय कृषी कार्यालय योग्य ठिकाणी असल्याचे त्यांनी सरकारचे अभार मानले. आमदार दाजी साळकर यांनीही यावेळी बोलताना शेतकऱ्यांना नैसर्गीक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. राज्यातील भाजपाचे सरकार जनतेच्या सेवेसाठी बांधील असल्याचे ते म्हणाले. जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, सरपंच सेनिया परेरा यांचेही भाषण झाले. कृषी संचालक नेव्हील आल्फान्सो यांनी उपस्थितांचे स्वागत केले.









