शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांचे शेतकऱ्यांना आवाहन
बेळगाव : बनावट दाखले दिल्याने जय किसान भाजी मार्केटचे लँड यूज आपोआप रद्द झाल्याचा आदेश सोमवारी बुडा आयुक्तांनी जारी केला आहे. त्यामुळे जय किसान भाजी मार्केट बंद होणार हे निश्चित असल्याने शेतकऱ्यांनी उद्यापासून एपीएमसी भाजी मार्केटला यावे, असे आवाहन कृषक समाजाचे भारतीय राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. मंगळवारी कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी व्यासपीठावर सुजित मुळगुंद, राजकुमार टोपण्णावर, अॅड. नितीन बोलबंडी आदी उपस्थित होते. सिद्धगौडा मोदगी म्हणाले, जय किसान भाजी मार्केट विरोधात 2013 पासून लढा दिला जात आहे. एपीएमसी येथील भाजी मार्केट राज्यातील दुसरे मोठे भाजी मार्केट आहे. एपीएमसीचे खासगीकरण रोखण्यासाठी केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडल्यानंतर शेतकऱ्यांना यश आले. राज्यात भाजपचे सरकार असताना जय किसान हे खासगी भाजी मार्केट सुरू झाले.
दरम्यानच्या काळात भारतीय कृषक समाजाच्यावतीने धरणे व आमरण उपोषण करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री बी. के. शिवकुमार आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करू, असे आश्वासन दिले होते. जय किसान भाजी मार्केटचे लँड यूज बदल करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्या अटींचे उल्लंघन झाल्याने लँड यूज बदल रद्द झाला आहे. त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. 10 एकर 20 गुंठे जमिनीत असलेले जय किसान भाजी मार्केट बंद होणार हे निश्चित असून शेतकऱ्यांनी उद्यापासून एपीएमसी भाजी मार्केटला यावे. महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांनी जय किसान भाजी मार्केटचा परवानाही रद्द करावा, शेतकऱ्यांच्या लढ्याला यश आले आहे, असे ते म्हणाले. यावेळी अॅड. नितीन बोलबंडी म्हणाले, जय किसान भाजी मार्केटचा लँड यूज बदल रद्द झाल्याने त्यांचे बिल्डिंग परमिशन व परवानाही रद्द होणार आहे. या भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट होत होती. अशा तक्रारी येत होत्या, असे ते म्हणाले.
नगरसेवकांनी माफी मागावी
जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश भक्तांना महाप्रसाद दिला जाईल, असे सांगितल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी गटातील नगरसेवकांकडून विरोध होत आहे. नगरसेवकांच्या या भूमिकेचा निषेध व्यक्त करतो. जिल्हाधिकारी सर्वधर्मीयांना घेऊन कार्य करीत आहेत. दूर वरून येणाऱ्या भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळावा. हे एकमेव ध्येय यामागे होते. महाप्रसादाचे वाटप केल्यास महापालिकेचे नाव आणखी चांगले झाले असते, पण हिंदुत्वाच्या नावावर निवडून येऊन असे कृत्य केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात सरकार व राज्यपालांकडे तक्रार करण्याची धमकी दिली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना काम करण्याची संधी द्या. महाप्रसादाला विरोध करणाऱ्या सर्व नगरसेवकांनी माफी मागावी, असे स़ुजित मुळगुंद म्हणाले.









