पोल्ट्रीधारकांसाठी कार्यशाळेचे आयोजन : सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
खानापूर : पोल्ट्री व्यावसायिकांनी शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. यासाठी सर्व कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकसंध राहणे गरजेचे आहे. तसेच कुक्कुटपालन करताना योग्य ती खबरदारी घेऊन या जोडव्यवसायातून आपले आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे वक्तव्य खानापूर तालुका पोल्ट्री फार्मर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने कुक्कुटपालन कार्यशाळेत बोलताना पोल्ट्री असोसिएशनचे ंअध्यक्ष जी. गंगाधर यांनी केले. येथील शिवस्मारकातील कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यशवंत बिर्जे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप हन्नूरकर यांनी पोल्ट्रीमालकांनी कुक्कुटपालन करताना कोणती खबरदारी घ्यावी आणि पिल्लाना योग्यवेळी कोणकोणते उपचार करावेत, याचे सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. महेश शिंदे यानी पोल्ट्रीमालकांनी कुक्कुटपालनात काम करताना घेण्यात येणारी स्वच्छता तसेच पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्यांनी घ्यावयाची स्वत:ची खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली. संघटनेचे उपाध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांनी, तालुक्यातील पोल्ट्री मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याची दखल घेऊन पोल्ट्री मालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात केलेल्या सूचना पोल्ट्रीधारकांनी अमलात आणून पोल्ट्रीमालकांनी व्यवसाय वाढवावा, असे सांगितले. आभार मल्लारी करंबळकर यांनी मानले. यावेळी बेळगाव व खानापूर तालुक्यातील शेकडो पोल्ट्रीमालक उपस्थित होते.









