लवकरच शेतकऱ्यांची बैठक : 60 टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी स्थगिती मिळविल्यास काम होणार बंद
बेळगाव : रिंगरोडविरोधात शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र प्राधिकरणाने त्या तक्रारी फेटाळल्या आहेत. त्यानंतर उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांना स्थगिती मिळाली आहे. मात्र ही संख्या अत्यंत कमी आहे. केवळ 38 जणांनीच स्थगिती घेतली आहे. त्यामुळे अजूनही त्याविरोधात स्थगिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर आणखी काही शेतकऱ्यांना उच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी सूचना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रिंगरोडमध्ये तालुक्यातील 32 गावांतील जमीन जात आहे. सदर जमीन सुपीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रिंगरोडला विरोध केला आहे. जवळपास 38 शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती मिळविली. मात्र या रिंगरोडमध्ये 2 हजारांहून अधिक शेतकऱ्यांची जमीन जात आहे. त्यामुळे किमान 1500 शेतकऱ्यांनी तरी स्थगिती घेणे गरजेचे आहे, असे वकिलांतून सांगण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. जर अधिक प्रमाणात स्थगिती घेतली नाही तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जमिनी कब्जात घेण्याचा प्रयत्न करण्यास मागेपुढे पाहणार नाही. तेव्हा शेतकऱ्यांनीही काळजीपूर्वक पुढे येणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे विरोध करायचा असेल तर किमान 60 टक्के शेतकऱ्यांनी तरी विरोध करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी म. ए. समितीच्या माध्यमातून आंदोलने करण्यात आली आहेत. याचबरोबर सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जमीन देणार नाही, अशी तक्रार दाखल केली होती. शेतकऱ्यांच्या त्या तक्रारी फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाशिवाय पर्याय नाही. सध्या शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासणार हे निश्चित आहे. तरीदेखील जमिनी वाचवायच्या असतील तर अधिकाधिक शेतकऱ्यांनी स्थगिती घेणे गरजेचे असल्याचे वकिलांनी स्पष्ट केले आहे. दिवाळी सणानंतर लवकरच पुन्हा एकदा शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करून स्थगिती मिळविण्यासाठी सूचना केली जाणार आहे. शेतकऱ्यांनीही यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. सध्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. लवकरात लवकर त्यांनाही स्थगिती मिळण्याची प्रक्रियादेखील अत्यंत सोपी आहे. मात्र एकजुटीने राहून सर्वांनीच त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत अॅड. एम. जी. पाटील, अॅड. शाम पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. प्रसाद सडेकर यांनी व्यक्त केले आहे.









