सततच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान : रोपे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय
बेळगाव : सततच्या पावसामुळे यावर्षी भात लावणीसाठी टाकलेले, पेरलेले भातरोप बहुतांश ठिकाणी उगवलेच नाही. काही ठिकाणी उगवले परंतु ते अति पाण्यामुळे कुजले. बहुतांश ठिकाणी उगवलेल्या भाताचे कोंब कबुतरांनी खराब केल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तालुक्यात सर्वत्र भातरोपांचा तुटवडा असल्याने जेथून मिळेल तेथून आणण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. परंतु सध्या अव्वाच्या सव्वा दराने तरूंची विक्री केली जात असल्याने भातशेती परवडणार कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे यावर्षी बेळगाव शहर तसेच तालुक्यातील भातउत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्याच्या दक्षिण भागात कुरीच्या साहाय्याने पेरणी केली जाते. परंतु, उर्वरित भागात मात्र रोपलावणी पद्धतीने भाताचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी मे महिन्याच्या अखेरपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भातरोप लावणीसाठी टाकलेला तरू आणि पेरलेले भातही उगवलेच नाही. जे उगवले ते अति पावसामुळे खराब झाले. काही शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा तरू लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पुन्हा पुन्हा कुजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भातबियाणांचे दर वाढून देखील शेतकऱ्यांनी तरू लागवडीचा प्रयत्न केला. परंतु, त्यामध्ये यश आले नाही.
बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण
मागील चार दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतल्यामुळे भातलावणीसाठी चांगला हंगाम उपलब्ध झाला आहे. परंतु, लागवडीसाठी तरूच नसल्याने तालुक्याच्या इतर भागात चौकशी केली जात आहे. परंतु, सर्वत्रच भातपिकासाठीचा तरू उपलब्ध होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण आहे. काही जणांकडे तरू उपलब्ध आहे. परंतु, तो अव्वाच्या सव्वा दराने विक्री केला जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत.
अन्य तालुक्यातून रोप आणण्याची वेळ
बेळगाव शहरातील शेतकरी अधिकाधिक भाताची लागवड करतात. परंतु, यावर्षी भातरोप उपलब्ध होत नसल्याने शेती करायची कशी? असा प्रश्न आहे. त्यामुळे इतर तालुक्यांमधून भातरोप आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याने सरकारने नुकसानभरपाईचा विचार करावा अशी मागणी होत आहे.
-नारायण सावंत, शेतकरी.









