उसाची वाडी मिळविण्यासाठी जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांची कसरत
बेळगाव : पावसाअभावी चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अपेक्षेनुसार पाऊस न झाल्याने पिकांची वाढ झाली नाही. परिणामी पावसाळ्यामध्ये जनावरांसाठी आवश्यक असणारा सुका चारा मिळणे कठीण झाले आहे. तर रब्बी हंगामातील पिकांवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू असल्याने उसाची वाडी मिळविण्यासाठी जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे. तालुक्यामध्ये भात पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा पाऊस अपेक्षेनुसार न झाल्याने बहुतांश भागात भात पीक करपून गेले आहे. तर काही भागामध्ये भात पिकाची अपेक्षेनुसार वाढ झाली नसल्याने सुक्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पैसे देऊनही सुका चारा मिळणे कठीण झाले आहे. तर चाऱ्याचे भावही गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चारा मिळेल तेथे धाव घ्यावी लागत आहे.
भविष्यातील चारा टंचाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांना ऊसतोडीचे काम करावे लागत आहे. एकेकाळी उसाची वाडी टाकून दिली जात होती. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. सध्या तालुक्याच्या गावामध्ये ऊस तोडणीचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यामुळे उसाची वाडी मिळविण्यासाठी शेतकरी पहाटेपासूनच उसाच्या मळ्यांमध्ये गर्दी करत आहेत. कोणत्या ठिकाणी ऊस तोडणी केली जाणार आहे, याकडे डोळे लावून बसावे लागत आहे. ऊस तोडणी करणारे कामगार असले तरी शेतकऱ्यांकडूनच चाऱ्यासाठी ऊस तोडणी करावी लागत आहे. ऊस तोड कामगारांना केवळ तोडणी केलेल्या उसाची मोळी बांधून ट्रॅक्टरमध्ये भरण्याचे काम करावे लागत आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे. पावसाळ्यात उपयोग केल्या जाणाऱ्या सुक्या चाऱ्याची आता बचत केली तर भविष्यातील टंचाई कमी होईल व जनावरांचे पालनपोषण करणे सोयीचे होईल, यासाठी उसाच्या वाडीसाठी धावाधाव करावी लागत असल्याचे जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यंदा रब्बी हंगामात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी प्रमाणे घेतले जाणारे ज्वारीचे पीक आलेले नाही. यामुळे भविष्यात सुक्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी उसाच्या वाडीचा चारा म्हणून उपयोग करणे गरजेचे झाले आहे. यासाठीच ऊस तोडणी होत असलेल्या ठिकाणी चाऱ्यासाठी पळापळ करावी लागत आहे, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
चाऱ्याचा प्रश्न गंभीर
सुका चारा मुबलक प्रमाणात नसल्यामुळे आता चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यामध्ये सुक्या चाऱ्याची नितांत गरज असते. सहा महिन्यापर्यंत सुक्या चाऱ्यावरच जनावरांचे संगोपन करावे लागते. यामुळे उसाची वाडी मिळविण्यासाठी उसाच्या मळ्यात जावे लागत आहे. वाडीवर सध्याचे दिवस जात असून भविष्यात उपलब्ध असलेल्या सुक्या चाऱ्यावर जनावरे पाळणे कठीण जाणार नाही.
– प्रमोद रेडेकर, शेतकरी अगसगे









