निवडणुकीसाठी शेतकरी बचाव गटाला शेतकऱ्यांचा पाठिंबा : ऊस उत्पादकांसाठी कार्य करणार
वार्ताहर / किणये
काकती येथील मार्कंडेय साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पदासाठी आज रविवार दि. 27 रोजी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शेतकरी बचाव पॅनेल कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी पाटील व आर. आय. पाटील यांच्या गटाला तालुक्याचा ग्रामीण भाग व शहर परिसरातून पाठिंबा वाढला आहे. मार्कंडेय साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी शेतकरी बचाव गटाला सत्तेवर आणण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
कारखान्यात परिवर्तन घडवून आणणार
रविवारी निवडणूक होणार असल्यामुळे शनिवारी दिवसभर शेतकरी बचाव पॅनेलच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला. शेतकरी बचावच्या तानाजी पाटील गटाला शेतकऱ्यांतून चांगला प्रतिसाद मिळत असून, या वेळेला मार्कंडेय साखर कारखान्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा विश्वास शेतकरी बचाव पॅनेलला आहे.
शेतकरी बचाव पॅनेलमधून 15 जागांसाठी 15 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. शेतकरी बचाव पॅनेलच्या या सर्व उमेदवारांनी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन कारखान्याचा आपण कशा पद्धतीने विकास करणार याबद्दलची माहिती तानाजी पाटील व आर. आय. पाटील यांनी दिली आहे.
शेतकरी बचाव पॅनेलमधून सामान्य गटातून जोतिबा नागेंद्र आंबोळकर, भाऊराव जयवंतराव पाटील, मल्लाप्पा तवनाप्पा पाटील, युवराज केदारी हुलजी, रामचंद्र (आर. आय. ) पाटील, शिवाजी वासुदेव कुट्रे, सिद्धाप्पा भरमा टुमरी निवडणूक रिंगणात आहेत.
तर अनुसूचित जाती (एससी ) गटातून परशुराम शटव्याप्पा कोलकार निवडणूक लढवीत आहेत. अनुसूचित जमाती (एसटी ) गटातून लक्ष्मण शिवाजी नाईक, महिला गटातून वनिता सुरेश अगसगेकर, वैष्णवी वसंत मुळीक या रिंगणात आहेत. मागासवर्गीय ‘अ’ गटातून बसवराज दुंडाप्पा गणिगेर, आर्थिक मागास ‘ब’ गटातून तानाजी मिनू पाटील व बिगर ऊस उत्पादक ‘ड’ गटातून बाबासाहेब निंगाप्पा भेकणे व सहकारी संघ ‘ब’ गटातून सुनील मल्लाप्पा अष्टेकर निवडणूक रिंगणात आहेत.
शनिवारी शहरासह तालुक्याच्या विविध गावांमध्ये शेतकरी बचाव पॅनेलचे प्रचारासाठी चार विभाग केले होते. त्यानुसार या उमेदवारांचे समर्थक व शेतकऱ्यांनी प्रचार केला.
बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय साखर कारखाना हा एकमेव कारखाना आहे. त्यामुळे इथल्या ऊस उत्पादक शेतक्रयांसाठी हा कारखाना अतिशय महत्त्वाचा आहे. शेतकरी बचाव पॅनलच्या माध्यमातून या कारखान्याचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. तसेच इथल्या स्थानिक ऊस उत्पादकांना योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. अशी माहिती माजी एपीएमसी सदस्य आर. के. पाटील यांनी दिली.
हा कारखाना लीज वर देण्याची कोणतीही आवश्यकता भासणार नाही. संचालकांनी कारखान्याच्या आणि शेतक्रयांच्या हितासाठी काम करणे गरजेचे आहे. या कारखान्याचा कायापालट शेतकरी बचाव पॅनल करू शकते. असे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी सांगितले.यावेळी पुंडलिक पावशे, निंगाप्पा जाधव व तालुक्याच्या विविध गावातील शेतकरी उपस्थित होते.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे व शेतक्रयांचे नेते रमाकांत कोंडुसकर यांचीही शेतकरी बचाव पॅनेलने भेट घेतली आहे.
शनिवारी काकती, कंग्राळी खुर्द ,कंग्राळी बुद्रुक, होनगा,, काकती, सावगाव, उचगाव, बाकनुर, बेळवटटी, बडस वाघवडे, होनगा ,बेनकनहळी नावगे, जानेवाडी, किणये, कर्ले, बिजगरणी,बेळगुंदी, सोनाली,बेनकनहळळी,सावगाव,मंडोळी,मजगाव, येळ्ळूर, बेकिंनकेरे, बाची, नंदीहळी यासह अन्य गावांमध्ये तसेच वडगाव शहापूर अनगोळ या भागात जोरदार प्रचार करण्यात आला असून या भागातील शेतक्रयांनी शेतकरी बचाव पॅनल ला आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.









