ज्यांच्या हातात देशाचं धोरण आहे त्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा असं कधीच वाटत नाही. सरकारमधल्या लोकांना जर शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले पाहीजे. जोपर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत केंद्र सरकार लक्ष घालणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी शरद पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “२०१० मध्ये ज्यावेळी कांद्यांच्या किंमती वाढल्या म्हणून भाजपाच्या लोकांनी दंगा घातला होता.
लोकसभेच कामकाज सुरु झालं तेव्हा भाजपाचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालून आले. त्यावेळी स्पीकरांनी त्यांना याबाबत विचारलं असता सरकारवर कांद्याचे भाव वाढल्याचा आरोप केला. त्यावर अध्यक्षांनी सरकारची धोरणे विचारली असता कांदा उत्पादक शेतकरी हा लहान शेतकरी आहे. त्याला जर बरे पैसे मिळत असतील इतर विरोध कशाला?” असा युक्तीवाद आपण केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “त्यावेळी मी कांद्याच्या माळा घाला नाही तर काहीही करा, पण निर्यात बंदी होणार नाही अशी भूमिका मी त्यावेळी घेतली होती. कांदा महाग झाला म्हणत आहेत. खाना मुश्किल हो गया है म्हणतात. कोण म्हणतं कांदा खा? नका खाऊ.” असाही टोला शरद पवारांनी लगावला आहे.
शेवटी बोलताना ते म्हणाले, “कांद्याच्या निर्यातबंदीचा एक निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतलाच पाहिजे. त्यासाठी शेतकरी जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत दिल्लीला संदेश जाणार नाही.”असेही ते म्हणाले.