परराज्यातील गाजर आवक रोखण्याची मागणी : दर कोसळल्याने गाजर उत्पादक शेतकरी आक्रमक
बेळगाव : बेळगावसह परिसरातील गाजराचा दर कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून परराज्यातील गाजराची आवक केली जात आहे. यामुळे स्थानिक गाजराचा दर तब्बल 25 ते 30 रुपयांनी कोसळला असून शुक्रवारी बेळगावमधील गाजर उत्पादक शेतकऱ्यांनी जय किसान भाजी मार्केटसमोर जोरदार आंदोलन केले. परराज्यातून येणारे गाजर यापुढे आणले जाणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. बेळगाव परिसरात झाडशहापूर, अनगोळ, मच्छे, मजगाव या भागात मोठ्या प्रमाणात गाजर उत्पादन घेतले जात आहे. येथील उत्पादित होणारे गाजर हे चांगल्या दर्जाचे असल्याने 35 ते 40 रुपये किलो दराने होलसेल भाजी मार्केटमध्ये विक्री होत आहे. परंतु, हा दर पाडवण्यासाठी काही व्यापारी इंदोर व नाशिक येथून गाजराची आवक करत आहेत. त्यामुळे बेळगावमधील गाजर अवघ्या 10 रुपये किलो दराने विक्री करावा लागत असल्याने शेतकरी कंगाल होत आहे.
आठवडाभरापूर्वी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना इशारा दिला होता. तरीदेखील परराज्यातील आवक सुरू असल्याने शुक्रवारी सकाळी आंदोलन छेडण्यात आले. जय किसान भाजीमार्केटच्या प्रवेशद्वारावर गाजर उत्पादक शेतकऱ्यांनी धरणे धरताच भाजीमार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच संबंधित व्यापाऱ्यांनाही बोलावून समज देण्यात आली. जोवर बेळगावचा स्थानिक गाजर बाजारात येईल, तोवर इतर राज्यातून गाजर आणला जाणार नाही, असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जय किसान भाजीमार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने तूर्तास या वादावर पडदा पडला आहे. परंतु, पुन्हा परराज्यातून गाजराची आवक झाल्यास हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. यावेळी प्रशांत बेळगावकर, महेश अनगोळकर, परशराम गोरल, शिवाजी नंदिहळ्ळी, कल्लाप्पा गोरल, परशराम नंदिहळ्ळी, यल्लाप्पा नंदिहळ्ळी, निंगाप्पा नंदिहळ्ळी यासह झाडशहापूर, मच्छे, अनगोळ येथील गाजर उत्पादक शेतकरी उपस्थित होते.









