वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंजाबमध्ये होत असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंधीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने लांबणीवर टाकली आहे. आता ती 2 जानेवारीला होणार आहे. गेल्या 35 दिवसांपासून उपोषण करणारे शेतकरी नेते रणजीतसिंग डल्लेवाल यांना आवश्यकता भासल्यास रुग्णालयात हलविण्यात यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पंजाब राज्य सरकारने या आदेशाचे क्रियान्वयन केले की नाही, हे जाणून घेण्यासाठी ही सुनावणी होणार होती, अशी माहिती देण्यात आली.
सध्या सर्वोच्च न्यायालयाला शीतकालीन सुटी आहे. त्यामुळे न्या. सूर्यकांत आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या सुटीतील खंडपीठाकडे कामाची सूत्रे आहेत. या खंडपीठाने या प्रकरणी सविस्तर सुनावणी मुख्य पीठासमोर होईल, असे स्पष्ट केले. 2 जानेवारीला शीतकालीन सुटी संपणार असून न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरु होणार आहे. मंगळवारच्या सुनावणीत पंजाब सरकारचे अधिवक्ता गुरमिंदर सिंग यांनी आणखी तीन दिवसांचा कालावधी मागितला. तो संमत करण्यात आला.
चर्चा होत आहे
शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी एक मंडळ स्थापन करण्यात आले असून त्याच्या माध्यमातून ही चर्चा होत आहे. ही चर्चा आंदोलन स्थळावर होत आहे. डल्लेवाल यांना रुग्णालयात नेण्यासंबंधी शेतकरी नेत्यांचे मन वळविण्यात येत आहे. ते सध्या खानौरी सीमारेषेवर पंजाबच्या परिसरात उपोषण करीत आहेत. त्यांच्यासाठी त्याच स्थानापासून काही अंतरावर तात्पुरते रुग्णालय सज्ज करण्यात आले आहे. तेथे त्यांना हलविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या एक दोन दिवसांमध्ये प्रयत्नांना यश येण्याची शक्यता आहे, असा युक्तीवाद सिंग यांनी केला.
टिप्पणी करणार नाही
केंद्र सरकारने आपल्याशी चर्चा केल्यास रुग्णालयात जाण्यास आपण तयार आहोत, असे डल्लेवाल यांचे म्हणणे असल्याचे प्रतिपादन गुरमिंदरसिंग यांनी केले. यावर, चर्चा कशी आणि कोणती होत आहे, यावर न्यायालय टिप्पणी करणार नाही. आमच्या आदेशाचे तुम्ही पालन केले आहे की नाही, एवढेच आम्हाला पहायचे आहे, असे असे स्पष्ट करत न्या. सूर्यकांत यांनी सुनावणी पुढे ढकलली.









