बिनव्याजी कर्जपुरवठा त्वरित करा : भ्रष्टाचारात गुंतलेल्या संचालकांवर कारवाईची मागणी
वार्ताहर/सांबरा
मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बुधवारी तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. दरम्यान बुधवारी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन व्यथा जाणून घेतल्या व श्रीराम सेना हिंदुस्थान शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे यावेळी ठामपणे सांगितले. रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, गेल्या तीन वर्षापासून येथील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर बिनव्याजी कर्जपुरवठा करणे गरजेचे आहे. तसेच प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघातील भ्रष्टाचारात गुंतलेल्या संचालकांवर कारवाईही झालीच पाहिजे. डीसीसी बँकेचे संचालक राजू अंकलगी यांनीही केवळ शेतकऱ्यांना आश्वासन देण्यापलीकडे काहीही केलेले नाही. त्यामुळे त्यांना भविष्यात शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास शनिवार दि. 16 ऑगस्ट रोजी मुतगे येथे रास्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
आमरण उपोषणाचा तिसरा दिवस
शेतकऱ्यांनी सोमवार दि. 11 पासून ठिय्या आंदोलन छेडले आहे. यातील युवा शेतकरी सचिन पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा त्यांनी निर्धार केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस असला तरी एकाही संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्यांची भेट घेतली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.









