कोबीला हमीभाव-नुकसानभरपाई देण्याची मागणी
बेळगाव : कोबीचा दर घसरला असल्याने शेतकऱ्यांना कवडीमोलाने कोबीची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, त्याचबरोबर सरकारने कोबीला योग्य हमीभाव द्यावा, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरु सेनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोबी ओतून ठिय्या आंदोलन केले. बेळगाव तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कोबीचे पीक घेतात. मात्र काबाडकष्ट करूनदेखील कोबीला योग्य हमीभाव देण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. प्रतिएकर 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो. हा खर्च लक्षात घेता सध्या भाजीमार्केटमध्ये कोबीला प्रति पोते 50 रुपये दर दिला जात आहे. कवडीमोल दराने भाजीची खरेदी केली जात असल्याने केलेला खर्चदेखील मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे कसे? कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे.
गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्या
कोबीला दर मिळत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे सरकारने लक्ष घालून कोबी पिकाला योग्य भाव द्यावा, त्याचबरोबर दर घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसानभरपाईदेखील द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोबी ओतून आंदोलन केले.
शेतकऱ्यांची मागणी सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन
शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत यांच्या साहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार केला. शेतकऱ्यांची मागणी सरकारपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.









