कर्ज वितरण करेपर्यंत मागे हटणार नसल्याची शेतकऱ्यांची भूमिका
वार्ताहर/सांबरा
शासनामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणारे बिनव्याजी कर्ज अद्याप वितरित न केल्याच्या निषेधार्थ मुतगे येथील शेतकऱ्यांनी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या कार्यालयासमोर सोमवार दि. 11 पासून शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन छेडले आहे. जोपर्यंत बिनव्याजी कर्ज शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने हे प्रकरण पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून शेतकऱ्यांना शासनामार्फत देण्यात येणारे बिनव्याजी कर्ज प्राथमिक कृषी पत्तीन संघाने वितरित न केल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. याचबरोबर संघामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भ्रष्टाचार केलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र त्यांच्या कोणत्याही मागणीची दखल घेण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे.
मंगळवार दि. 11 पासून शेतकऱ्यांनी आंदोलनाला प्रारंभ केला असून बुधवारीही दिवसभर कार्यालयासमोर शेतकरी बसून होते. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी काहींनी शासन दरबारी प्रयत्न सुरू केले आहेत. तर काहींनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसून जोपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत नाही. तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. युवा शेतकरी सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला आहे.









