एकीची वज्रमूठ आवळली : पंधरा दिवसांत कोणत्याही हालचाली न झाल्यास पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील काकती-होनग्यानजीक रस्तारोको करण्याचा इशारा

वार्ताहर /सांबरा
शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एकीची वज्रमूठ आवळली असून आम्ही रिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. येत्या पंधरा दिवसांत रिंगरोड रद्द करण्याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत तर पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग काकती-होनग्यादरम्यान बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.शासनाकडून रिंगरोडसाठी तालुक्यातील सुपीक जमिनी घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यानंतर साधारण पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांनी रिंगरोडला विरोध दर्शविला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता रिंगरोडसाठी जमिनी घेण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाकडून आंदोलन छेडण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी मुतगा येथे राज्य महामार्गावर रास्तारोको आंदोलन छेडले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शेतकरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमू लागले होते. सकाळी साडेअकरा वाजता माजी आमदार मनोहर किणेकर यांनी श्रीफळ वाढवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर आंदोलनाला प्रारंभ केला. सर्व नेते, शेतकरी व महिलांनी रस्त्यावरच भर उन्हात ठाण मांडून शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. प्रारंभी समितीचे नेते भागोजी पाटील म्हणाले, शासनाने सध्या झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे त्यांना जागे करण्यासाठी आंदोलन छेडले आहे. सध्या रिंगरोडची काहीही गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी रिंगरोडच्या माध्यमातून बळकावण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.
…तर रिंगरोड प्रस्ताव रद्द करावा
श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या एका काडीलाही धक्का लागू दिला नव्हता. मात्र सध्याचे शासनकर्ते हे शिवरायांच्या विचारावर चालत असल्याचे मिरवतात. ते खरोखरच शिवरायांच्या विचारावर चालत असतील तर त्यांनी रिंगरोड प्रस्ताव रद्द करावा. रयत संघटनेचे नेते चुनाप्पा पुजारी म्हणाले, रिंगरोडसाठी एकाही राजकीय नेत्याची जमीन जात नसल्याने ते स्वत:च्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या, शेतकऱ्यांवर जेव्हा-जेव्हा अन्याय झाला तेव्हा म. ए. समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. सध्या केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे. म. ए. समितीचे नेते आर. एम. चौगुले म्हणाले, सध्या बेळगावमध्ये फ्लायओव्हर केल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटणार असून कमी पैशांमध्ये फ्लायओव्हर होणार आहे. सरकारने याचा विचार करून रिंगरोड रद्द करावा.
चिकोडी रयत संघटनेचे नेते राजू पवार म्हणाले, सध्याचे राज्यकर्ते हे शेतकऱ्यांच्या नावावर निवडून येतात व निवडून आल्यानंतर त्यांच्याविरोधातच वागतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांनी नादी लागू नये. अॅड. सुधीर चव्हाण म्हणाले, रिंगरोड रद्द करण्यासाठी सध्या कायदेशीर लढाई सुरू आहे. तसेच रस्त्यावरील लढाईदेखील गरजेची आहे. माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले, गेल्या पाच महिन्यांपासून रिंगरोड रद्द करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, काही वृत्तपत्रांतून रिंगरोड होण्यासंदर्भातील नोटिफिकेशन आले. त्यानंतर संबंधित कार्यालयात तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व भव्य चाबूक मोर्चा काढला. तरीही शासनाकडून रिंगरोड रद्द करण्याच्या कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. धारवाड कार्यालयात निवेदन दिले. त्यापाठोपाठ झाडशहापूर येथे रास्तारोको आंदोलन छेडले. तरीही शासन मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर म्हणाले, शासनाकडून या ना त्या कारणाने पूर्व भागातील शेकडो एकर जमिनीचे भूसंपादन केले आहे. त्यामुळे मुतगे परिसरात मोजकीच जमीन शिल्लक आहे.
तोडगा काढण्याचे आश्वासन
शेवटी प्रांताधिकारी बळीराम चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व निवेदनाचा स्वीकार करून शेतकऱ्यांचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी दीड वाजता रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
चोख पोलीस बंदोबस्त
तब्बल दोन तास चाललेल्या रस्तारोको आंदोलनामुळे बेळगाव-बागलकोट राज्यमार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामीणचे एसीपी गोपाळकृष्ण गौडर, मारिहाळचे पोलीस इन्स्पेक्टर चंद्रशेखर तिगडी यांच्यासह बागेवाडी व काकती येथील पोलीसही परिस्थितीवर नजर ठेवून होते.
आंदोलनात म. ए. समितीचे नेते प्रकाश मरगाळे, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर, श्रीराम सेनेचे भरत पाटील, सचिन पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष किरण पाटील, रामचंद्र मोदगेकर, दत्ता उघाडे, पुंडलिक पावशे, दीपक पावशे, शामराव पाटील, आर. आय. पाटील, अॅड. श्याम पाटील, आर. के. पाटील, मधु मोदगेकर, मनोहर हुक्केरीकर, पिराजी पालकर, इराप्पा जोई, भालचंद्र पाटील, कृष्णा हुंदरे, संजय पाटील, नारायण सावगावकर यांसह म. ए. समिती, श्रीराम सेना व शिवसेनेचे कार्यकर्ते, मुतगा, निलजी, शिंदोळी, सांबरा, कलखांब, मुचंडी व तालुक्यातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन नारायण कणबरकर यांनी केले.
स्थानिक नेत्यांची आंदोलनाकडे पाठ
सोमवारी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या रास्तारोको आंदोलनाला म. ए. समिती, शिवसेना, श्रीराम सेना, सर्व शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता. मात्र पूर्वभागातील राष्ट्रीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी याकडे पाठ फिरवली. त्यामुळे आंदोलनस्थळी शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.









