जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने समाधान, मात्र उघडीप नसल्याने नाराजी
बेळगाव : गेल्या चार दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून नाले, गटारींची सफाई केली जात आहे. पावसाळ्यात संक्रमित आजार देखील डोके वर काढतात. त्यामुळे आरोग्य विभागदेखील अलर्ट झाला आहे. त्याचबरोबर पावसाळी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी गेल्या चार-पाच दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाची रिपरिप सुरूच आहे. दिवसा तसेच रात्रीवेळी देखील पाऊस सुरू असल्याने एकंदरीत पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात अतिदक्षतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सततच्या रिपरिपीमुळे विविध ठिकाणी पाणी साचण्यासह चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यंदा समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही.
राकसकोप जलाशयात पाणीपातळी स्थिर
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पातळी सध्या स्थिर आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू नये यासाठी एलअँडटीकडून उन्हाळी नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार हिडकल जलाशयातून अधिक पाणी उपसा केला जात होता. राकसकोप जलाशयातून पाण्याचा कमी उपसा केला जात असला तरी यंदा पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात झाले.
यंदा पाणी समस्या दूर होण्यास मदत
यावर्षी वळीव तसेच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे. शेतकरी वर्ग गवतगंजीवर झाकण्यासाठी प्लास्टिक दुकानात खरेदीसाठी येताना दिसत आहेत.
बी-बियाणे, खते, औषधे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
त्याचबरोबर रेनकोट आणि छत्री खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होत आहे. पावसाने उघडीप दिल्यास पेरणीच्या कामांची धांदल उडणार आहे. त्यामुळे बी-बियाणे, रासायनिक खते, औषधे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची रयत संपर्क केंद्रांवर गर्दी होत आहे. कृषी खात्याकडून देखील खबरदारी घेण्यात आली असून खरीप हंगामात बी-बियाणे औषधे व रासायनिक खतांचा तुटवडा भासू नये यासाठी आवश्यक साठा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून जादा पैसे आकारल्यास संबंधित दुकानदारावर भरारी पथकाकडून कारवाई केली जात आहे. येळ्ळूर, वडगाव, अनगोळ, धामणे आदी शिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून, पावसाने उघडीप दिल्यास पेरणीच्या कामांना सुरुवात होणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस धूळवाफ पेरणी केली जात होती. मात्र यंदा मान्सूनपूर्व पावसाने उघडीप न दिल्याने शेतकरी पाऊस कमी होण्याची वाट पाहत आहेत.









