सर्व्हेसाठी आलेल्यांना धाडले माघारी
बेळगाव : कणबर्गी योजना क्रमांक 61 मधील 50 एकरचा वाद न्यायालयात आहे. यापैकी 25 एकर जमिनीमध्ये कोणताही प्रकल्प राबवू नये, यासाठी न्यायालयाने आदेश दिला आहे. असे असले तरी गुरुवारी बुडा अधिकाऱ्यांनी 61 क्रमांकमध्ये सर्व्हेसाठी प्रयत्न केला. दरम्यान शेतकऱ्यांनी विरोध करून अधिकाऱ्यांना माघारी धाडले. योजना क्रमांक 61 मधील 25 एकर जमिनीत न्यायालयाने प्रकल्प राबवू नये यासाठी स्थगिती दिली आहे. मात्र बुडाकडून सातत्याने न्यायालयाचा आदेश झुगारून प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बुडाने निविदा प्रक्रियादेखील हाती घेतली होती. मात्र शेतकऱ्यांनी विरोध केला होता. नगरविकास प्राधिकारने निवासी योजनेसाठी नव्याने 159 एकरात निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र यापैकी 50 एकर जमिनीचा न्यायालयात वाद आहे. यापैकी 25 एकर क्षेत्राला शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र बुडाकडून प्रकल्पासाठी अट्टहास केला जात आहे. गुरुवारी या 25 एकर क्षेत्रामध्ये अधिकारी सर्व्हेसाठी गेले होते. मात्र शेतकऱ्यांनी न्यायालयाने स्थगिती दिल्याचे सांगून विरोध केला. दरम्यान बुडाच्या अधिकाऱ्यांनी तेथून काढतापाय घेतला.









