शेतीचा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने ठिय्या आंदोलन
खानापूर : तालुक्यात शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आणि सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी लावून धरली. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, तहसीलदार प्रकाश गायकवाड व हेस्कॉमच्या अधिकारी कल्पना तीरवीर यांनी चर्चा करून येत्या दोन दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. उरली सुरली पिके पाणी देऊन जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. मात्र गेल्या महिन्याभरापासून हेस्कॉमकडून शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत वेळोवेळी त्यांना सूचना करूनदेखील पूर्वीप्रमाणे थ्री फेज विद्युत पुरवठा करण्यात येत नसल्याने अखेर पूर्व भागातील शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.
त्यानंतर या ठिकाणी आमदार विठ्ठल हलगेकर व भाजपचे पदाधिकारी तहसीलदारांशी चर्चा करून हेस्कॉमच्या अधिकारी कल्पना तीरवीर यांना या ठिकाणी बोलावून घेतले त्यानंतर शेतकऱ्यांसमोरच चर्चा करून शेतीसाठी लागणारा विद्युत पुरवठा येत्या दोन दिवसांत सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. संपूर्ण तालुक्यात सध्या भात आणि इतर पिके ऑक्टोबर हिटमुळे पूर्णपणे करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उरली-सुरली पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र विद्युत पुरवठा नसल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना विनंती करूनही हेस्कॉमकडून विद्युत पुरवठ्याबाबत कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि गुऊवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. विद्युत पुरवठा करण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर भाजप जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष संजय कुबल मल्लाप्पा मारिहाळ यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दोन दिवसांत सुरळीत वीजपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.









