भाजी मार्केट ते राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत बैलगाडी, भाजीपाल्यासह पायी रॅली : महिलांचा सहभाग लक्षणीय : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
बेळगाव : ‘जय जवान, जय किसान’, ‘देशाला आहार पुरविणाऱ्या शेतकऱ्यांचा विजय असो’ अशा घोषणा देत जय किसान भाजी मार्केट सुरू करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. भाजी मार्केट ते राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत बैलगाडी, भाजीपाल्यासह रॅली काढण्यात आली. यानंतर चन्नम्मा सर्कलमध्ये ठाण मांडून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली होती. तसेच परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मंगळवारी सकाळपासूनच जय किसान भाजी मार्केट परिसरात विविध भागातील शेतकरी येत होते. यानंतर शेतकऱ्यांनी पायी मोर्चाद्वारे राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत धडक मारली. आंदोलनात बैलगाड्यांचाही समावेश करण्यात आला होता. तसेच विक्रीसाठी आणलेला भाजीपालाही आंदोलनात आणण्यात आला होता. आंदोलनात महिलांचा सहभागही लक्षणीय होता. यावेळी शेतकऱ्यांची मोठी संख्या पाहता शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राणी चन्नम्मा सर्कलपासूनची वाहतूक इतर मार्गावरून वळविण्यात आली होती.
राज्य सरकारकडूनच खासगी जय किसान भाजी मार्केटमध्ये होलसेल भाजीपाला विक्रीला परवानगी देण्यात आली होती. यानंतर येथे पूर्ण सज्जतेने मार्केट सुरू करण्यात आले. याचा शेतकऱ्यांनाही लाभ होत होता. मात्र काही संघटनांकडून याविरोधात आंदोलन करत भाजी मार्केट बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, अद्याप निकाल देण्यात आलेला नाही. भाजी मार्केटचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने राज्य सरकारकडून मनमानीप्रमाणे परवाना रद्द करून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप शेतकऱ्यांतून करण्यात आला.
राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी जय किसान भाजी मार्केटचा परवाना रद्द करण्यात आला. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून याची अंमलबजावणी करत व्यवहार बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. भाजी मार्केटमुळे विविध तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयीचे झाले होते. कारण महामार्गालगत मार्केट असल्याने वाहतुकीसही अनुकूल होते. यामुळे शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी मोठ्या संख्येने येत होते. मात्र आता प्रशासनाकडून मार्केट परवाना रद्द करण्यात आल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, असा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात आला. आंदोलनस्थळी खासदार इराण्णा कडाडी, माजी आमदार संजय पाटील यांनी भेट दिली.
शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ
आसपासच्या तालुक्यातील शेतकरी जयकिसान भाजी मार्केटला आपला भाजीपाला विक्री करण्यास येत होते. मात्र आता भाजी मार्केट परवाना रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना शहराबाहेर असलेल्या एपीएमसीकडे जाणे कठीण होत असून वाहतुकीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे सदर भाजी मार्केट पुन्हा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. एकीकडे जय किसान भाजी मार्केट इमारत परवाना रद्द करण्यासाठी तर दुसरीकडे पुन्हा पूर्वीप्रमाणे जय किसान भाजी मार्केट सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
सायंकाळी आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी भेट दिली. सरकारने जयकिसान भाजी मार्केटवर केवळ होलसेल विक्रीवर बंदी आणली असून रिटेल विक्रीला परवानगी आहे. त्यामुळे या आदेशानुसार या जागेत होलसेल विक्री करता येणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजी मार्केट वगळता इतरत्र दोन एकर जागा देऊन तात्काळ एनए करून देऊ. पण जयकिसान भाजी मार्केटमध्ये होलसेल विक्री करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागलीच रिटेल विक्री सुरू करावी.
घाईगडबडीने निर्णय नको
हा विषय उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने घाईगडबडीने निर्णय घेता येणार नाही. याबाबत कृषीमंत्री व पालकमत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.









