पावसाने उघडीप दिल्याने धावपळ : 80 टक्के पेरणी पूर्ण
बेळगाव : मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अनगोळ शिवारात पेरणी हंगामासाठी शेतकरी बांधवांची धावपळ पहावयास मिळत आहे. मागील काही दिवसात चांगल्या पावसाने हजेरी लावल्याने अनगोळ, वडगाव, शहापूर, मजगाव, येळ्ळूर, जुनेबेळगाव येथील शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणीपूर्वी आपल्या शेतातील मशागतीची कामे मार्गी लावून घेतली होती. त्यामुळे गेल्या आठ-पंधरा दिवसात पावसाने आणि निसर्गाच्या साथीने चांगला हंगाम मिळाल्याने शेतकरी बांधवांनी धूळवाफ पेरणीला सुरुवात केली. त्यामुळे या भागातील शिवारात चांगलीच वर्दळ पाहावयास मिळत आहे. बैलगाडी, ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर्सच्या साहाय्याने शेतकरी शेतीकामात दंग झालेला पहावयास मिळत आहे.
अनगोळ भागातील शेतकरी बांधवांनी यंदाही धूळवाफ पेरणीची संधी साधली. बऱ्याच शेतकरी बांधवांनी पेरणी पूर्ण केली आहे. तर अजून कांही भागात पेरणी सुरू आहे. तरी अनगोळ शिवारात जवळपास 80 टक्के शेतकरी बांधवांनी पेरणी पूर्ण केली आहे. यंदा शिवारात बासमती, कुमुद, साईराम, ओमसाई, इंद्रायणी, चिंटू, कावेरी अशी विविध नावे असलेली भातांची पेरणी करीत आहेत. दररोज वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी उर्वरित शिल्लक भातपेरणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी बांधव प्रयत्न करताना पहावयास मिळत आहेत. त्यामुळे शिवारातील रस्त्यावर पेरणीची आणि मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकरी धावपळ करताना पहावयास मिळत आहे. बदलते वातावरण आणि पावसाचे प्रमाण याचा अंदाज घेत शेतकरी शेताची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
अनगोळ भागातील शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी बैलजोडीने पेरणी करण्यावर भर दिल्याचे पहावयास मिळाले. पण पेरणीपूर्व मशागतीसाठी ट्रॅक्टर आणि पॉवर ट्रिलरचा वापर केला. त्यामुळे अनगोळ शिवारात मशागतीचे काम व पेरणीचे काम हे वेळेत पूर्ण झाल्याचे पहावयास मिळते. तसेच ज्या शेतकऱ्यांची शेती जास्त आहे त्यांनी हंगामाचा विचार करून ट्रॅक्टरने पेरणी पूर्ण करून घेतली. अनगोळ शिवारामध्ये शेतकरी बांधव भाजीपाला लागवडही मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे अजूनही बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतात भाजीपाला पहावयास मिळत आहे. कोथिंबिर, पालेभाजी, गाजर, कोबीज यांची लागवड करण्यात आली होती. भाजीपाला काढण्यासाठी शेतकरी गडबड करताना पहावयास मिळत आहे. कारण भाजीपाला काढल्यानंतर उर्वरित पेरणी लवकरच पूर्ण करावयाची आहे. त्यामुळे आता काढणीची लगबग पहावयास मिळत आहे. त्यामुळे एकंदरीत शेतकरी बांधव हे हंगाम साधण्यात व्यस्त झालेला पहावयास मिळत आहे.









