भाग्यलक्ष्मीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीला सामोरे जाणार
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची संजीवनी असलेल्या भाग्यलक्ष्मी साखर कारखान्यात शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा हास्यास्पद आरोप करत शासनाकडून चौकशी लादण्यात आलेली आहे. मात्र कारखान्यात कोणताच भ्रष्टाचार झालेला नसून गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांचे हितच जपण्याचे प्रयत्न महालक्ष्मी शुगर अँड अॅग्रो कंपनीकडून केलेले आहेत. मात्र राजकीय वैरत्वापोटी बेछूट आणि बिनबुडाचे खोटे आरोप करून भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याच्या सुरळीत चालू असलेल्या हंगामावर विपरित परिणाम करण्याच्या हेतूने हे कटकारस्थान केलेले आहे. आम्ही कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत. आमच्याकडून शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार विठ्ठल हलगेकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी साखर आयुक्तांकडे भाग्यलक्ष्मी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार दाखल करून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. या मागणीच्या आधारे शासनाने चौकशी आयोग नेमून चौकशीला प्रारंभ केलेला आहे. आम्ही या चौकशीस सर्वतोपरी सहकार्य करत असून यापुढेही चौकशी संपेपर्यंत सर्वप्रकारचे सहकार्य करणार आहोत. आम्ही हा कारखाना लैला शुगर्सकडून भाडेतत्त्वावर घेताना शासनाच्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करूनच घेतलेला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना ताब्यात घेतला आहे. आम्ही गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांची उसाची बिले पूर्ण दिली असून शेतकऱ्यांना योग्य तो दर दिलेला आहे. महालक्ष्मी ग्रुपकडून शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही, याची खबरदारी कायम घेण्यात आली आहे.कारखान्याचा सुरुवातीपासूनचा इतिहास तालुक्यातील सर्वांनाच माहित आहे. असे असतानाही आम्ही हा कारखाना बंद पडू नये, हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कारखाना चालविण्यासाठी घेतला आहे. कारखान्याचे संस्थापक निळकंठराव सरदेसाई यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहोत. आम्ही कामगारांचेही हित जपलेले आहे, असे आमदार हलगेकर म्हणाले.









