अनिश्चित पाऊस, बदलते हवामान, वाढत्या मजुरीमुळे अर्थकारण बिघडले, शेतकरी चिंतेत
प्रतिनिधी /बेळगाव
इंधन दरवाढी पाठोपाठ रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झाल्याने शेतकऱयांचे कंबरडे मोडले. त्यामुळे महागाईच्या कचाटय़ात सापडलेल्या शेतकऱयाच्या डोक्मयावर खताच्या दरवाढीचा बोजा वाढला आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
अनिश्चित पाऊस, वाढती मजुरी, रासायनिक खतांचा वाढता दर यामुळे शेतीचे अर्थकारण बिघडले आहे. त्यातच दरवषी रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील काही वर्षात अतिवृष्टी, बदलते हवामान यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे खतांच्या किंमती वाढत असल्याने शेतकरी दुहेरी कचाटय़ात सापडला आहे. खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने शेतीतील उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसणे कठीण झाले आहे.
यंदा वादळी वळिवामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यातच खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱयांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. भाजीपाला, फळबागायत यासह कडधान्य पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळे शेती उत्पादन आणि विक्रीचा प्रश्न देखील शेतकऱयांसमोर उभा ठाकला होता. दरम्यान बाजारपेठा बंद राहिल्याने काही माल शेतातच पडून नुकसान सोसावे लागले होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या आहेत. मात्र रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने पिके कशी घ्यावीत आणि उत्पादन कसे काढावे, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. येणाऱया खरीप हंगामाच्या तोंडावरच रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे.
भाववाढीने शेती करणे कठीण
रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे. गतवषीदेखील खतांच्या किंमती वाढल्या होत्या. दरवषी खतांच्या किंमती वाढत असल्या तरी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेती करणे कठीण झाले आहे. ट्रक्टर भाडे, बी-बियाणे, रासायनिक खते, मजुरी यांचा उत्पादनाशी ताळमेळ बसणे कठीण झाले आहे.
– अरुण हुंदरे (शेतकरी)









