वार्ताहर/धामणे
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे धामणे, बस्तवाड, हालगा, नागेनहट्टी, नंदिहळ्ळी, देसूर, राजहंसगड, सुळगा (येळ्ळूर) या भागातील शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे थांबल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला गेल्या 15 दिवसांपासून सुरुवात केली होती. परंतु गेल्या 10 दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोर केल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामात पावसामुळे अडचण येवून मशागतीची कामे बंद झाल्याने या भागातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
कारण रोहिणी नक्षत्रापासून शेतकरी वर्ग भातपेरणीला सुरुवात करतात. परंतु सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पेरणीपूर्व मशागतीची कामे तशीच राहिली आहेत. पावसाचे प्रमाण जास्त झाले असल्यामुळे शेतात पेरणीसाठी ट्रॅक्टर किंवा बैलजोडी चालेनासे झाले आहे. पावसामुळे शिवारात चिखल झाला आहे. आतापासून पाऊस थांबला तरी मशागत करून पेरणीसाठी 8 दिवसानंतर हंगाम मिळेल असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे असून जर पावसाने उघडीप दिली नाही तर यंदा पावसाळी पिकाच्या पेरणी भात, भुईमूग, बटाटा व इतर पावसाळी पिकांच्या पेरणीसाठी या भागातील शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणार असल्याचे या भागातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.









