वनखाते सक्रीय, मात्र जंगलात हुसकावण्याचे प्रयत्न असफल : खबरदारीचे आवाहन कायम
खानापूर : चापगाव येथे एका अस्वलाचा पिल्लासह वावर असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याला या अस्वलाच्या बंदोबस्त करण्यास अपयश आले असून, वनखात्याने चापगाव परिसरातील शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच अस्वल आढळल्यास तातडीने वनखात्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले असून, चापगाव परिसरात वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अस्वलाचा बंदोबस्त करण्यात अपयश आल्याने शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत. चापगाव परिसरात गेल्या आठ-दहा दिवसापासून एक अस्वल आपल्या पिल्लासह वावरत असल्याचे शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडले होते. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी चापगाव येथील शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. वनखात्याचे कर्मचारी सातत्याने चापगाव परिसरातील वन विभागात तसेच शेती पट्ट्यात गस्त घालत आहेत. मात्र अस्वल जंगलात परतवून लावण्यास अद्याप वनखात्याला यश आलेले नाही.
मोठ्या प्रमाणात ऊस वाढल्याने अस्वलाला शोधण्यात अडचणी
याबाबत वनाधिकारी श्रीकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, गेल्या दोन-तीन दिवसापासून माझ्या नेतृत्वाखाली संपूर्ण चापगाव परिसरात पाहणी करत आहोत. एका बाजूला मलप्रभा नदी तर दुसऱ्या बाजूला जंगल तर पलिकडच्या बाजूला संपूर्ण पट्ट्यात जवळपास पाच हजार एकरवर ऊसपीक आहे. सध्या ऊस पीक जोमाने वाढलेले असल्याने अस्वलाचा ठावठिकाणाचा शोध घेणे कठीण बनले आहे. तरी वनखात्याचे कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील आहेत. तसेच अस्वल नागरिकांच्या दृष्टीस पडल्यास तातडीने वनखात्याशी संपर्क करावा, असे आवाहन श्रीकांत पाटील यांनी केले आहे. चापगाव परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्तीसाठी नियुक्ती केली असून, वन कर्मचारी सातत्याने लक्ष ठेवून आहेत. गेल्या दोन दिवसापासून अस्वल दिसले नसल्याने ऊस पिकामुळे शोध घेणे कठीण झाले आहे. तरीही वनखात्याकडून शक्य तितकी खबरदारी घेऊन अस्वलाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.









