बँक खात्यावरती पैसे जमा करेपर्यंत काम करू न देण्याचा संतप्त शेतकऱ्यांचा इशारा : भरपाईची रक्कम त्वरित जमा करण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
बसुर्ते येतील धरणाच्या कामाला प्रारंभ करून सहा महिने उलटले. मात्र अद्याप कोणत्याही शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती शासनाने पैसे न घातल्याने संतप्त शेतकऱ्यांनी चाललेले धरणाचे काम बंद पाडले. जोपर्यंत बँक खात्यावरती पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत काम करायला देणार नाही, अशी शेतकरी वर्गाने काम सुरू असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तंबीही देण्यात आली. आणि काम बंद पाडण्यात आले. बसुर्ते गावाशेजारीच धरणाच्या कामाचा मोठा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
सदर प्रकल्प राबवण्यापूर्वी या भागातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून या संदर्भात बैठक घेऊन ज्या शेतकऱ्यांची शेती या धरणात जाणार आहे. अशा शेतकऱ्यांना येत्या दोन महिन्यात प्रत्येकाच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात येतील असे सांगण्यात आले होते. मात्र सहा महिने उलटले तरी अद्याप एकाही शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नसल्याने बुधवारी शेतकऱ्यांनी धरणाचे काम सुरू असलेल्या परिसरात मोठ्या संख्येने जाऊन आंदोलन छेडले आणि सुरू असलेले धरणाचे काम बंद पाडले. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत काम करू नये, अशाप्रकारच्या जोरदार घोषणाबाजी करून येथील सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना चालू असलेले काम बंद पाडण्यास भाग पाडले.
धरणासाठी हजारो एकर भू संपादन
शासनाने तातडीने बसुर्ते गावातील शेतकऱ्यांची हजारो एकर पिकाऊ जमीन या धरणात गेलेली आहे. मात्र शासन या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप पैसे टाकायला तयार नाही. आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला असून संशयाची पाल चुकचुकत असल्याचे बोलले जात आहे. यासाठी जोपर्यंत आता शासनाकडून शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी या धरणात गेलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ठरल्याप्रमाणे जी रक्कम असेल ती जोपर्यंत जमा केली जाणार नाही तोपर्यंत काम करू देणार नाही, असे या भागातील असंख्य शेतकऱ्यांनी चंग बांधला आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करा आणि नंतरच काम सुरू करा, असे काम सुरू असलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना यावेळी सांगून सदर काम थांबविण्यात आले आहे.









