पेरलेले भात थोडे जरी उगवले तरी वाचण्याची शक्यता
बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर येण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे. शेती पेरणीसाठी तयार नसताना देखील शेतकरी घाईघाईने पेरणी उरकून घेत आहेत. त्यामुळे बळ्ळारी नाल्याचा प्रश्न यंदादेखील तसाच असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरवर्षी अवकाळी पाऊस झाल्यानंतर शेतकरीवर्ग पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागतो. मात्र, यंदा अवकाळी बरोबरच मान्सूनपूर्व पावसाने सतत हजेरी लावल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. जमिनीत ओलावा निर्माण झाला असल्याने मशागत करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याचबरोबर केरळमध्ये मान्सून दाखल झाला असल्याने पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरवर्षी पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर येतो. मात्र, नाल्याचे पाणी वाहून जाण्यास अडथळे असल्याने दरवर्षी पुराचे पाणी परिसरातील शेतांमध्ये पसरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
बळळारी नाल्याच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्याने बळ्ळारी नाल्याचा प्रश्न जैसे थे आहे. पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना दुबार किंवा तिबार पेरणी करण्याची वेळ दरवर्षी येते. सततच्या पावसामुळे पूर आल्यास पेरणी खोळंबू शकते, या भीतीने बळ्ळारी नाल्याच्या परिसरातील शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. शेतीची मशागत झालेली नसताना देखील केवळ पुराच्या भीतीमुळे शेतकरी घाईघाईने भातपिकाची पेरणी करत आहेत. रविवारी सुटीच्या दिवशी बळ्ळारी नाला परिसरात बांधावर शेतकऱ्यांची धांदल पहावयास मिळाली. दरवर्षी बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देखील मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हे दुखणे संपणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









