कसबा बीड/ प्रतिनिधी
सावरवाडी ता.करवीर येथील ग्रामस्थांनी पावसासाठी ग्रामदैवत भैरवनाथास गाव अभिषेक घातला. यावर्षी मान्सूनचा हंगाम लांबल्याने भोगावती-तुळशी नदीतील पाणीसाठा कमी झाला आहे. शिवाय उपसाबंदीचे आदेश यामुळे ऊस व इतर शेतपीके वाळू लागली आहेत. पिण्याच्या पाण्याची ही समस्या गंभीर बनली असून,शेतकरी हतबल झाला आहे.
हातातोंडाला आलेली पिके जगविण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत आहेत.याचाच एक भाग सावरवाडी गावातील ग्रामस्थांनी पावसासाठी ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे गाव अभिषेक घातला. सदाशिव भटजी,केरबा गुरव, तुकाराम भाट यांनी देवाच्या मृर्तीला अभिषेक घालून पुजा केली आणि सामुदायिक आरती करून देवाकडे प्रार्थना करत गाऱ्हाने घातले. यावेळी देवाची सामुदायिक आरती ही केली. लवकरात लवकर पाऊस पडु दे,आणि बळीराजावरील संकट टळू दे…!!अशी प्रार्थना गावकऱ्यांनी केली. अभिषेक वेळी मंदिरात तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गजानन खोत, सदाशिव खाडे, रंगराव कंळत्रे, रघुनाथ लाड, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, गावातील सर्व सहकारी संस्थांचे सदस्य,यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.