दापोली :
दापोली कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत तयार केलेल्या भाताच्या संशोधनात रत्नागिरा-८ हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. यावर्षी कोकण कृषी विद्यापीठाने ‘रत्नागिरी-८’ या वाणाचे २०० टन बियाणे वितरित केले असून या विक्रीतून विद्यापीठाने २४ लाखाची उलाढाल केली आहे. कोकणातील पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या शेतकऱ्यानी या वाणाला पसंती दर्शवल्याचे समोर आले आहे.
दापोली कोकण कृषी विद्यापीठांतर्गत २०१८ साली रत्नागिरीनजीकच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्रात हे वाण विकसित झाले. १३५ ते १३८ दिवसात तयार होणारे हे पीक मध्यम बारीक आणि चवीला दर्जेदार आहे. त्यामुळे दरवर्षी या वाणाची मागणी वाढत आहे. ‘महाबीज’ देखील कोकण कृषी विद्यापीठातून या वाणाची उचल करत आहेत. ना नफा ना तोटा या तत्वावर ६० रुपये प्रतिकिलो दराने विद्यापीठाने या वाणाची विक्री केली आहे.
पाणथळी शेतीसाठी हे वाण वरदान असून वाणाची कमी उंची असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. दरवर्षी या भाताची गोडी शेतकऱ्यांना लागत असून अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा या वाणाची पेरणी करण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाने या वाणाच्या उत्पन्न वाढीवर अधिक भर दिला आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडीशा, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सहा राज्यांनी देखील या वाणाला पसंती दिली आहे. बदलत्या हवामानावर टिकून राहणाऱ्या या वाणात रोग प्रतिकारक्षमता अधिक आहे.








