धाराशिव/ उमरगा :
उमरगा तालुक्यातील मुरूम शहरातील संतप्त शेतकऱ्यांनी वीज महावितरणच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी धडक मोर्चा काढला. शेतशिवारातील आणि घरगुती वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात . त्यामुळे ही मनमानी कारभार बंद करा अशी मागणी करत महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला घेराव घालून रोष व्यक्त केला. दरम्यान उमरगा येथील मुख्य केंद्रातूनच वीज पुरवठा कमी दाबाने वितरित होत आहे , सुरळीत आणि वाढीव वीज पुरवठयासाठी वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठवले आहे. मात्र वरूनच हा प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडलेला आहे, त्यामुळे वीज पुरवठयाची समस्या आहे.असे कनिष्ठ अभियंता सचिन वाघमारे यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले.
मुरूम शिवारातील ब्याळे फिडर, भोसगे फिडर तसेच गडीशिवार फिडर या शेती शिवारात अनियमित आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. तसेच वीज पुरवठा सुरू झाल्यास कमी दाबाने वीज उपलब्ध होत आहे त्यामुळे विद्युत मोटारी असूनही शेतीपिकाला वेळेनुसार पाणी देता येईना.शेतातील जनावरांसाठी पाणी मिळवणे देखील त्रासदायक ठरत आहे. वेळेनुसार आणि सुरळीत वीज पुरवठा का करत नाही ? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला .मुरूम व शेत शिवारातील खंडित वीज पुरवठयाची समस्या लवकर सोडवा अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. या मोर्चात शहरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महावितरण बद्दल रोष व्यक्त केला.








