बेळगावसह बैलहोंगल तालुक्यातील स्थिती : बियाणेच उगवले नसल्याने शेतकऱ्यांत चिंता
बेळगाव : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक पीक मिळण्याची आशा होती. मात्र ही आशा फोल ठरत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे चित्र बेळगावसह बैलहोंगल तालुक्यात दिसून येत आहे. संपूर्ण जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. कृषी खात्याकडून पुरविण्यात आलेली बियाणे पेरणी केल्यानंतर त्यांची उगवणच झाली नाही. परिणामी खात्याकडून देण्यात आलेली बियाणे निकृष्ट दर्जाची असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.
समाधानकारक मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून रयत संपर्क केंद्रातून माफत दरात बियाणे खरेदी केली होती. यानंतर सोयाबीनची पेरणी केली होती. हंगामासाठी खरेदी केलेली विशिष्ट ब्रँडची बियाणे वितरित करण्यात आली होती. मात्र पेरणी केल्यानंतर पीकच उगवले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. यातच चार दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणीच पाणी झाल्याने दुहेरी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
तसेच शेतीची मशागत, खते, औषधांचा खर्च केला होता. मात्र पीकच वाया गेल्याने शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना पेरणी व पीक व्यवस्थापनाच्या सर्वोत्तम पद्धतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले होते. पण पिकेच वाया गेल्याने याचा उपयोग झाला नाही. मान्सूनपूर्व पावसानंतर पेरणीसाठी बियाणे वाटण्यात आले होते. पण दुर्दैवाने बियाणे अपेक्षेप्रमाणे उगविले नाही. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड होऊन शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.
कृषी खात्याकडून उपाययोजना
शेतकऱ्यांना चांगले पीक मिळेल, अशी आशा होती. पण पीक उगवले नसल्याने त्यांना समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र लागवडीपासून ते पिकांच्या काळजी करण्यापर्यंत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यास कृषी खाते कटिबद्ध आहे. यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नसून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कृषी खात्याकडून उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी सांगितले.









