कोळपणीचा ‘एक टाळ आणि बारा आळ’ म्हणीचा हलगा भागातील शेतकऱ्यांना प्रत्यय
वार्ताहर/सांबरा
‘कोळपणीचा एक टाळ आणि बारा आळ’ या म्हणीचा प्रत्यय आता हलगा भागातील शेतकऱ्यांना जाणवत आहे. शेतकरी शेती करत असताना योग्य हंगामानुसार कामे केली व पावसाने शेतकऱ्यांना आपल्या नियमित ऋतूप्रमाणे साथ दिली तरच शेतकऱ्यांचा उद्धार होत असतो. व शेतातील पिके योग्य वेळेत व चांगली येतात. यावर्षी खरीप हंगामातील भातशेतीला म्हणावं तितकं योग्य हंगाम पावसानं न दिल्यामुळे शेतकऱ्यांना भातातील तण काढण्यामध्ये जास्त काम लागत आहे. परिणामी शेतकऱ्याला जादा श्रम व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची जी पूर्वीची म्हण होती, ‘एक टाळ आणि बारा आळ’ याचा प्रत्यय आता शेतकऱ्याला येत आहे. हलगा परिसरात खरीप मोसमात बागायत जमिनीमध्ये भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकरी हे पीक घेत असताना कुरीच्या सहाय्याने पेरणी करतात. यावर्षी मे महिन्यातच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पेरणीला उशीर लागला व पेरणी झाल्यानंतर पावसाने आपली संततधार कायम ठेवल्यामुळे या भात पिकातील कोळपणी करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य हंगाम मिळाला नाही.
यामुळे शेतकऱ्यांनाविना कोळपणी भातातील तण काढण्याच्या कामाला प्रारंभ करावा लागला आहे. यामुळे भातपिकांमध्ये मोठ्याप्रमाणात तण वाढले आहे, हे तण काढताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.मजुरांचा तुटवडा तर जाणवत आहेच व वाढलेली मजुरी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. योग्य हंगामात कोळपणी झाली तरच शेतकऱ्यांचे तण काढण्याचे काम कमी होते. त्यामुळे लोक म्हणत होते की ‘एक टाळ आणि बारा आळ’ याचा प्रत्यय आता येत आहे. जेवढे कोळपणीचे एक टाळ काम करते तेवढे हे काम बारा मजूर करतात, याचा प्रत्यय यावर्षी शेतकऱ्याला येत आहे. बेळगाव तालुक्यातील पूर्वभागातील शेतकरी हे कुरीच्या साहाय्याने पेरणी करतात. तर पश्चिम भागातील शेतकरी मोठ्याप्रमाणात रोप लागवड करतात. एकदा चिखल करून रोप लागवड केली तर त्यामध्ये तण काढण्याचे काम राहत नाही, यामुळे शेतकऱ्यांचे तण काढण्याचे वाचते. यावर्षी पूर्व भागातील शेतकऱ्यांना हे तण काढताना जास्त मजुरी लागल्यामुळे रोप लागवडीचा पर्याय उत्तम असल्याचे त्यांना जाणवत आहे. यामुळे पुढीलवर्षी या भागातील शेतकरी रोप लागवडीकडे वळतील यात शंका नाही.









