

तानाजी पाटील गटाचे 10 तर पोतदार पॅनेलचे 5 उमेदवार विजयी
वार्ताहर /काकती
काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी चुरशीने भागधारकांनी भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत प्रामुख्याने अविनाश पोतदार पॅनेल आणि तानाजी पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलमध्ये अटीतटीचा सामना रंगला. अखेर शेतकरी बचाव पॅनेलचे 10 उमेदवार विजयी होऊन तानाजी पाटील गटाने मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यावर निर्विवाद सत्ता प्राप्त केली. अविनाश पोतदार पॅनेलचे 5 उमेदवार विजयी झाले. दोन्ही गटाच्या सहमतीनेच आता साखर कारखान्याचा कारभार चालवावा लागणार आहे. या साखर कारखान्याच्या निवडणुकीत 15 संचालक मंडळाच्या जागांकरिता 38 उमेदवार रिंगणात होते. यापैकी अविनाश पोतदार पॅनेलचे 15 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी अवघे 5 उमेदवार निवडून आल्याने त्यांना समाधान मानावे लागले. तर शेतकरी बचाव पॅनेलने 15 पैकी 10 जागांवर विजय संपादन केला आहे. अविनाश पोतदार आणि तानाजी पाटील हे संचालक एकाच गटातील होते. काही मतभेदामुळे निवडणुकीला सामोरे जावे लागले. अखेर तानाजी पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलला निर्विवाद यश संपादन करता आले. या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळाली असून यात शेतकरी बचाव पॅनेलचे सिद्धाप्पा भरमा टुमरी, शिवाजी वासुदेव कुट्रे, जोतिबा नागेंद्र अंबोळकर, लक्ष्मण शिवाजी नाईक, वनिता सुरेश अगसगेकर, बाबासाहेब निंगाप्पा भेकने, सुनिल मल्लाप्पा अष्टेकर यांनी संचालक पदावर बाजी मारली आहे तर अविनाश पोतदार पॅनेलमधील बाबुराव सिद्राई पिंगट एका नव्या उमेदवाराला संधी लाभली आहे.
दिग्गजांचा पराभव
अविनाश पोतदार पॅनेलात 10 उमेदवारांचा पराभव झाला असून वरिष्ठ संचालक मनोहर हुक्केरीकर, अनिल कुट्रे, निलिमा मनोज पावशे, प्रदीप मारुती अष्टेकर, भरत गंगाधर शानभाग अशा दिग्गजांना हार पत्करावी लागली आहे. तसेच पॅनेलचे नवखे उमेदवार अनिल यल्लाप्पा पावशे, अशोक परशराम नाईक, सत्यप्पा मुचंडी, उदय सिद्दण्णावर, यल्लाप्पा नागाप्पा रेमान्नाचे हे पराभूत झाले आहेत. शेतकरी बचाव पॅनेलचे भाऊराव पाटील, मल्लाप्पा तवनाप्पा पाटील, युवराज केदारी हुलजी, परशुराम कोलकार, वैष्णवी मुळीक आदींनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
परिवर्तन घडवून आणले : आर. आय. पाटील
शेतकऱ्यांनी व कारखान्याच्या सभासदांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे. शेतकरी बचाव पॅनेलवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी अधिक विश्वास ठेवून मतदान केले आहे. आता सर्व संचालक एकजुटीने शेतकऱ्यांना साखर कारखान्याच्या माध्यमातून विविध योजना पुरवण्यासाठी व काही प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. अलीकडे ऊस पीक हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक म्हणून पाहिले जात आहे. तालुक्यात उसाचे उत्पादनही वाढत आहे. त्यामुळे इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळवून देण्याचा प्रयत्न दोन्ही गटातील संचालक मंडळ या कारखान्याच्या माध्यमातून करणार आहोत.
गटतट विसऊन कारखान्याचा विकासासाठी काम करणार -तानाजी पाटील
तालुक्यातील व शहर भागातील शेतकऱ्यांनी मार्कंडेय साखर कारखान्यासाठी शेतकरी बचाव पॅनल या आमच्या गटावर विश्वास ठेवून दहा उमेदवारांना विजय मिळवून दिला आहे. निवडणूक अतिशय चुरशीने झाली. मात्र यापुढे गटतट विसरून केवळ कारखान्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व संचालकांना एकत्र घेऊन आम्ही काम करणार आहोत. तसेच तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढविणार असून या कारखान्यात तालुक्यातील अधिक ऊस गाळप करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही अधिक प्रयत्न करणार आहे.
शेतकरी बांधवांचे हित साधून विकास करावा-अविनाश पोतदार
मावळते चेअरमन अविनाश पोतदार म्हणाले की, आमच्या पॅनेलचा पराभव स्वीकारत निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन करतो. ज्या जिद्दीने निवडून आला त्याच प्रेरणेने कारखाना आणि शेतकरी बांधवांचे हित साधून विकास करावा हीच सर्वांना शुभेच्छा.









