धीरज बरगे,प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur News : आशिया खंडातील नावाजलेल्या शेतकरी सहकारी संघाचा ढेपाळलेला बैल पुन्हा उभारी घेत आहे.गेल्या दोन वर्षात शासकीय व अशासकीय मंडळाच्या कार्यकाळात संघ पुन्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.सुमारे दोन कोटी रुपये तोट्यात असलेल्या संघाला मागील आर्थिक वर्षात 13 लाख रुपयांचा फायदा झाला आहे.यामुळे तोटा काहीसा कमी झाला असला तरी या पारदर्शक कारभारामुळे संघाला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.सभासदांमधून अशासकीय मंडळाच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त होत आहे.पुढील काळातही अशाच पद्धतीने कारभार चालवत संघाचा पुन्हा नावलौकीक निर्माण व्हावा,अशी अपेक्षा सभासदांमधून व्यक्त होत आहे.
स्वातंत्र्यपुर्व काळात 23 ऑक्टोबर 1939 साली पी.ए.राणे आणि तोडकर वकील यांनी शेतकरी सहकारी संघाची स्थापना झाली.करवीर संस्थानात स्थापन झालेल्या या संघाने सहकाराची ओळख संपूर्ण जगाला करुन दिली.बझार,औषधे,खते,पेट्रोल,डिझेल अशा अनेक व्यवसायांमध्ये संघ आघाडीवर होता.मात्र 1990 नंतर संघाची सुरुवात तोट्याकडे झाली.1996 नंतर तर संघाची आर्थिक परिस्थिती अधिकीच बिकट झाली ती आजही कायम आहे. मात्र गेल्या अडीच वर्षात शासकीय व अशासकीय मंडळाने पारदर्शक व्यवहार करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
सभासदांचे निवडणुकीकडे लक्ष
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत निवडणुक विभागाने स्थगिती दिली आहे.गेल्या अडीच वर्षांपासून संघाचा कारभार शासकीय,अशासकीय मंडळाकडून सुरु आहे.याकाळात संघ थोडाफार फायद्यात आल्याने सभासदांनी मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अशासकीय मंडळाचे अभिनंदन केले.आता सप्टेंबरनंतर होणाऱ्या संघाच्या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या संचालक मंडळानेही अशाच पद्धतीने कारभार चालवत संघास गतवैभव मिळवून द्यावे,अशी अपेक्षा सभासदांची आहे.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे
शेतकरी संघाच्या रुतलेल्या चाकाला पुन्हा गती द्यायची असल्यास संघमध्ये अनुभवी,प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असणे आवश्यक आहे.मात्र सध्या संघाकडे अशा कर्मचाऱ्यांची वानवा आहे. अनुभवी कर्मचारी बऱ्यापैकी सेवानिवृत्त झाल्याने सध्या संघामध्ये नव्या उमेदीचे कर्मचारी आहेत.त्यामुळे संघाच्या पुर्वापार चालत आलेल्या व्यवहार पद्धतींवर मर्यादा येत आहेत.त्यामुळे या कर्मचाऱ्यांना अनुभवी कर्मचाऱ्यांकडुन प्रशिक्षितक करणे गरजेचे आहे.पुढील काळात सत्तेवर येणाऱ्या संचालक मंडळासमोर कर्मचारी वर्गाला प्रशिक्षित करण्याचे आव्हान असणार आहे.
संघात पुन्हा मोठयाप्रमाणात अपहार होणार नाही
संघामध्ये पुर्वी ताळेबंद छाननी, शाखा रुजवात,शाखा तपासणी यापद्धतींमधून संघाच्या कारभारावर नजर ठेवली जायची.पण यापद्धती गेल्या काही वर्षांपासून बंद होत्या.अशासकीय मंडळाने कारभार हाती घेतल्यानंतर यापद्धती पुन्हा सुरु केल्या.यामधुन कार्वे शाखेतील अपहार समोर आला.संघाची पुर्वीपासून सुरु असलेली तपासणीची हि पद्धत पुढीलकाळातही नियमितपणे सुरु ठेवल्यास संघात पुन्हा मोठयाप्रमाणात अपहार होणार नाही, असा विश्वास अशासकीय मंडळाने व्यक्त केला आहे.
पारदर्शक कारभारातून संघाला गतवैभव शक्य
शेतकरी संघाची पुढील काळात निवडणुक होईल.यानतंर सत्तेमध्ये येणाऱ्या संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करणे अपेक्षित आहे.सद्यस्थितीत सुरु असल्याप्रमाणे पुढील काळातील संचालक मंडळाने कारभार केल्यास शेतकरी संघाला नक्कीच पुन्हा गतवैभव प्राप्त होईल.
– सुरेशराव देसाई,अध्यक्ष अशासकीय मंडळ









