सावंतवाडी / प्रतिनिधी
अर्चना घारे यांची विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडे मागणी.
The government should try to give a guaranteed price of 150 rupees to cashew!
सावंतवाडी – दोडामार्ग – वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघासह तळकोकणातील शेतकऱ्यांना काजू बी साठी राज्यशासनाने १५० रू प्रति किलो हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आज आदरणीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्याकडे अर्चना घारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे . गेल्या वर्षीच्या तुलनेत काजू बी चे दर सुमारे २५-३०% कमी झाले आहेत. एकीकडे काजू गराचे दर वाढत असताना काजू बी चे दर कमी होत आहेत. गेल्या वर्षी मिळालेला १३५ ते १४० रुपयांचा दर यावर्षी १००-१०५ रुपयांवर आला आहे.सध्या काजूगराचा दर १२०० ते १५०० रुपये किलो आहे. मात्र, काजू-बी ला नाममात्र १०० ते १०५ रुपये किलो असा व्यापारी भाव दिला जात आहे. काजू उत्पादनातील ही तफावत शेतकऱ्यांच्या मेहनतीवर घाला घालणारी आहे.काजू-बी खरेदीचे व्यापाऱ्यांचे धोरण हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. वातावरणातील बदल, मजुरीचे वाढलेले दर खतांचे वाढलेले दर, कीड रोग व्यवस्थापन, वन्य प्राण्यांसह आग व चोरांपासून होणारे नुकसान या सगळ्यांशी झुंजत काजू उत्पादन घेणे अवघड झाले आहे. सध्या बाजारातील काजू- बी दर अत्यंत कमी असून व्यापारी मनमानीपणे दर लावत असून याला चाप लावण्यासाठी सरकारने १६० रुपयांचा हमीभाव जाहीर करावा , तसेच काजू बी खरेदी केंद्र सुरू करावीत, ज्यामुळे या परिसरातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे यांनी केली.यावेळी ना.अजितदादा पवार म्हणाले की, “कोकणातील काजू – बी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा भाव अन्यायकारक असून, याबाबत काजू उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना तात्काळ हमीभाव जाहीर करण्याची मागणी करणार आहे.









