बाची येथील शेतकऱ्यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर
वार्ताहर /उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातील बाची परिसरातून जाणाऱ्या रिंगरोडसाठी बाची गावामध्ये शुक्रवारी सकाळी रिंगरोडचे मार्किंग करण्यासाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना येथील नागरिकांनी मंदिरात आणून चांगलेच धारेवर धरले. आणी त्यांना जाब विचारत अखेर पळवून लावले. सध्या बेळगाव ग्रामीण भागामध्ये शेतकरी शेतीच्या कामात मग्न असून शेतीची कामे जोरदार सुरू आहेत. येथील शेतकरी खरीप हंगामामध्ये गुंतला असताना शासकीय अधिकाऱ्यांनी या भागातून जाणाऱ्या रिंगरोडसाठी नकळत व कुणालाही कोणतीही पूर्वसूचना न देता रिंगरोडचे मार्किंग गुप्तपणे सुरू केले होते. गेल्या दोन दिवसापासून मार्किंगसाठी चुना, दगड, दोऱ्या व मशीन असे साहित्य घेऊन मार्किंग करण्याचा सपाटा या भागात शासकीय अधिकाऱ्यांनी चालवला होता. मात्र शुक्रवारी सकाळी बाची गावातील शेतीमध्ये सदर प्रकार सुरू असताना याचा सुगावा ग्रामपंचायत सदस्य गुंडू गुंजीकर, एल. आर. मासेकर, लक्ष्मण गुंजीकर, दत्तात्रय देवरमणी, सागर गुंजीकर, बसवंत देवरमनी, निळू कांबळे असे जवळपास 25 ते 30 शेतकऱ्यांना लागताच शेतकरी एकत्र धावून गेले आणि या रिंगरोडसाठी मार्किंग करणाऱ्या अधिकाऱ्यांना घेराव घालून अक्षरश: पळवून लावले.
बाची तसेच आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, उचगाव, कल्लेहोळ, सुळगा गावालगत असलेल्या शेतवडीतून सदर रिंगरोड शासनाच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी सर्व्हेही केला आहे. मार्गात येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना शासनामार्फत यापूर्वी नोटिसा पाठवल्या होत्या. परंतू नोटिसीला उत्तर देण्यासाठी अधिकारीच गैरहजर राहिले होते. आता पुन्हा मार्किंग करण्याचा सपाटा चालवल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन आठवड्यात उचगावमध्येही असाच प्रकार घडला. कुणालाही विश्वासात न घेता रिंगरोडसाठी अकस्मात मार्किंग सुरू केले. यावेळी शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना पिटाळून लावले.









