शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत : गेल्यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात मलप्रभेला10 फूट होते पाणी
खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. या पावसाने फक्त पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच तालुक्यातील नदी-नाले प्रवाहित झाले आहे. तालुक्यातील शेतकरी मोठ्या व जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या दोन दिवसापासून आभाळात मोठ्या प्रमाणात ढग जमत आहेत. मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागीलवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात मलप्रभा नदी दुथडी भरुन वाहत होती. यावर्षी मात्र नदी-नाले फक्त प्रवाहित झाले आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कणकुंबी, जांबोटी, लोंढा, नागरगाळी, शिरोली परिसरातील शेतवडीत पाणीच पाणी झाले होते. पावसामुळे भांडूरा, कळसा, हलात्री, कुंभार नाल्यासह इतर नाले भरुन वाहून लागल्याने मलप्रभा, पांढरी या नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. मलप्रभा नदीला दहा फुटाच्यावर पाणीपातळी होती. गेल्यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांची रोप लावणी, हंबडणही झाल्या होत्या. तसेच भात पिकाची उगवण योग्यप्रकारे झाली होती. त्यामुळे शेतकरी समाधानी झाला होता.
यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणीची कामे खोळंबली होती. मे महिन्याच्या शेवटी झालेल्या हलक्या पावसात शेंतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र गेल्या महिन्याभरात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे भात पिकाची म्हणावी तशी वाढ झाली नाही. तसेच भाताची उगवणही योग्यप्रकारे झाली नसल्याने शेतकऱ्यांना त्रासदायक झाले आहे. खानापूर तालुक्यात 75 टक्के पेरणी आटोपली आहे. शेतकऱ्यांच्या नजरा संततधार पावसाकडे लागून राहिल्या आहेत. यावषी 24 जूनपासून पावसाने हजेरी लावली. त्यानंतरही पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाच्या हलक्मया सरी कोसळत आहेत. संततधार पावसाने पाठ फिरविली आहे. परिणामी, भात लागवडीची कामे संथगतीने सुरू आहेत. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. प्रामुख्याने ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन ही पिके घेण्यात येतात. पावसाने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र पिकांची वाढ म्हणावी तशी झालेली नाही. येत्या आठवड्यात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. अन्यथा पिकांच्या वाढीवर परिणाम होणार आहे.









