सुनील पाटील, आजरा
जून महिना मध्यावर आला तरी अजून मोसमी पावसाचा पत्ता नाही. तरीही काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भात टोकणी व पेरणीचे काम पूर्ण केले आहे.जेथे पाण्याची सोय आहे तेथे शेतकऱ्यांनी भात रोप लावणीचे तरवेही टाकले आहेत.पाणी देऊन तरव्यांची उगवण करून घेतली असली तरी आता पाण्याअभावी उगवलेले तरवे करपून जाण्याची भिती शेतकरी वर्गाला सतावत आहे.पावसाअभावी खरीप पेरणी लांबणीवर पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेल्या आणि अति पावसाचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजरा तालुक्यात गेल्या काही वर्षात मोसमी पावसाचे आगमन अनियिमतपणे होताना दिसत आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वीचा विचार करता तालुक्यात प्रत्येक वर्षी गुढीपाडव्यानंतर वळीव पाऊस व्हायचे आणि खरीप हंगामासाठी शेती तयार करण्यासाठी शेतकरी कामाला लागत असे. प्रत्येक वर्षी 7 ते 10 जून पर्यंत मोसमी पाऊस तालुक्यात हमखास दाखल होत असे. मान्सून कधी येणार हे निश्चित असल्याने 10 जून पूर्वीच शेतकरी भात पेरणी करून घ्यायचा, रोप लावणीचे तरवे टाकून भुईमूग व सोयाबीन पेरणीच्या कामाला लागत होता. तर हे काम संपताच नाचणीची लावण करून पिकाच्या मशागतीच्या कामाला सुरूवात केली जात होती.
गेल्या दहा वर्षांच्या काळात ग्लोबल वार्मिंगचा परिणाम पावसाच्या आगमनावर झाला आहे. त्यामुळे मोसमी पावसाची अनियमितता असल्याने खरीप हंगामातील पेरणी आणि मशागतीचे शेतकऱ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. गतवर्षीदेखील दर पंधरा दिवसाला किमान एक वळीव पाऊस झाला होता. यावर्षी मात्र वळीव पाऊस झालाच नाही. जून महिन्याच्या सुरूवातीला हलक्या स्वरूपाचा एक पाऊस झाला आणि पाऊस सुरू होईल या आशेने शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली. मात्र मशागतीसाठी उपयुक्त असा पाऊस न झाल्याने मशागतीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला होता.
अंदमान निकोबार आणि त्यानंतर केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन झाल्याच्या बातम्या कानावर पडताच शेतकऱ्यांनी लवकरच महाराष्ट्रात मोसमी पाऊस येईल या आशेने काही ठिकाणी धूळवाफ पेरणी केली. पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी भात रोप लावणीचे तरवे टाकून पाणी दिले. पाणी दिल्याने तरव्यांची उगवण झाली खरी पण अद्याप पावसाचा पत्ता नाही. तर हिरण्यकेशी नदीवर उपसाबंदी सुरू झाल्याने उगवण झालेले तरवे आता कडक उन्हामुळे करपून जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
येत्या दोन दिवसात एखादा वळीव पाऊस झाला तरच धूळवाफ केलेली पेरणी आणि रोप लावणीसाठी टाकण्यात आलेले तरवे याची उगवण होऊ शकेल. तर उगवण झालेले तरव्यांना संजीवनी मिळेल. अन्यथा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. दररोज आभाळ भरून येत आणि शेतकऱ्यांना किमान आज पाऊस येईल अशी आशा वाटते. गेले आठवडाभर तालुक्यात असाच पावसाचा खेळ सुरू असून तालुक्यातील शेतकरी चाकतकाप्रमाणे पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसला आहे.









